एकाच ताटात जेवण्यास नकार दिल्याने बायकोला केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 09:03 PM2021-09-13T21:03:18+5:302021-09-13T21:03:43+5:30
Nagpur News एकाच ताटात एकत्र जेवण्यास नकार दिल्यावरून आरोपी पतीने त्याच्या पत्नीस मारहाण करीत जखमी केले. जखमी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची सूचनापत्रावर सुटका करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकाच ताटात एकत्र जेवण्यास नकार दिल्यावरून आरोपी पतीने त्याच्या पत्नीस मारहाण करीत जखमी केले. जखमी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची सूचनापत्रावर सुटका करण्यात आली. ही घटना मौदा शहरातील तक्षशीलनगर येथे गुरुवारी (दि. ९) रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. (Man beat his wife for refusing to eat at one plate)
राकेश मेश्राम (२२, रा. तक्षशीलनगर, इंडालको गेट मोबाईलजवळ, मौदा) असे आरोपीचे नाव असून, चकॅली राकेश मेश्राम, असे जखमी महिलेचे नाव आहे. राकेशचे तीन वर्षांपूर्वी चकॅलीशी लग्न झाले असून, त्याला दारूचे व्यसन आहे. तो तिच्यावर संशय घेतो व तिला मारहाण करतो. त्यामुळे ती मंगळवारी (दि. ७) आपल्या वहिनीकडे गेली होती. दरम्यान, गुरुवारी राकेश तिथे गेला व तिला एकाच ताटात जेवण्यासाठी आग्रह करू लागला. यावर तिने नकार दिल्याने आरोपीने तिच्या गालावर व उजव्या हातावर ब्लेडने वार करून जखमी केले. याबाबत तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.
याप्रकरणी मौदा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीला ताब्यात घेत त्याची सूचनापत्रावर सुटका केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक राजू आंधळे करीत आहेत.