पत्नीसोबत रंगेहात पकडले अन् गब्बरने प्रियकराला चाकूने भोसकले
By दयानंद पाईकराव | Published: October 31, 2023 04:49 PM2023-10-31T16:49:09+5:302023-10-31T16:49:09+5:30
आरोपीला साथीदारासह अटक : आणखी एक साथीदार फरार
नागपूर : पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडलेल्या पतीने संतापाच्या भरात साथीदारांच्या मदतीने प्रियकराला चाकून भोसकून ठार केले. ही थरारक घटना इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री ३ ते ३.१५ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान इमामवाडा पोलिसांनी आरोपीला त्याच्या साथीदारासह अटक केली असून त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे.
नितीन सोहनलाल रोहनबाग (वय ३८, रा. गंगाबाई घाट) असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. तर गब्बर ऊर्फ राजेश सौदान चव्हाण (वय ४७, रा. आयसोलेशन हॉस्पीटलजवळ ईमामवाडा), रितेश उर्फ बाबल्या संजय झांझोटे (वय ३३) आणि अनिकेत श्रावण झांझोटे (वय २७) दोघे रा. नवीन वस्ती, धोबी घाटजवळ, सदर अशी आरोपींची नावे आहेत. ईमामवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गब्बर हा शासकीय रुग्णालयात नोकरीला आहे. त्याला दोन बायका असून दोघींनाही दोन-दोन मुले आहेत. पहिल्या पत्नीला न सांगता त्याने नात्यातील एका युवतीसोबत लग्न केले. तर मृतक नितीन रोहनबाग हा गब्बरचा मित्र आहे. मित्र असल्यामुळे नितीनचे गब्बरच्या घरी येणे-जाणे होते.
मागील काही दिवसांपासून गब्बर आणि त्याच्या पत्नीचे भांडण झाले. त्यावेळी नितीन गब्बरच्या घरी आला होता. या दरम्यान नितीनचे गब्बरच्या पत्नीशी प्रेमसंबंध निर्माण झाले. पत्नीशी भांडण झाल्यामुळे गब्बर मागील १५ दिवसांपासून पहिल्या पत्नीकडे रहायला गेला होता. दरम्यान गब्बरच्या पत्नीसोबत नितीनच्या भेटीगाठी वाढल्या. त्यांच्यात शरीरसंबंध निर्माण झाले. ते खुलेआम एकमेकांना भेटु लागले. याची कुणकुण लागताच गब्बरने आपले साथीदार बाबल्या आणि अनिकेतसोबत संगणमत करून नितीनला आपल्या पत्नीसोबत नको त्या अवस्थेत पाहताच चाकूने भोसकून त्याचा खून केला.
या प्रकरणी ईमामवाडा पोलिसांनी मृतक नितीनची पत्नी माधुरी हिच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध कलम ३०२, ३४, सहकलम४/२५ नुसार गुन्हा दाखल करून गब्बर आणि त्याचा साथीदार बाबल्याला अटक केली आहे. आरोपींचा साथीदार अनिकेत अद्याप फरार असून इमामवाडा पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पाळत ठेवली, खात्री केली अन् काढला काटा
आपल्या पत्नीचे नितीनसोबत अनैतिक संबंध असल्याची कुणकुण गब्बरला लागल्यानंतर तो संतप्त झाला. त्याने आपले साथीदार बाबल्या आणि अनिकेतच्या साह्याने मागील दोन दिवसांपासून पत्नीवर पाळत ठेवली. नितीन मध्यरात्री पत्नीच्या खोलीवर येतो आणि पाटेच्या सुमारास परत जातो, याची तीघांनीही खात्री केली. त्यानंतर तीघांनी नितीनचा काटा काढण्याचे ठरविले. मंगळवारी रात्री एक वाजता नितीन गब्बरच्या पत्नीच्या घरात शिरला. त्यानंतर तिन्ही आरोपींनी पहाटे चार वाजताच्या सुमारास आत शिरुन दोघांना रंगेहात पकडले. त्यानंतर आरोपींनी चाकु, लाकडी दांड्याने व विटाने वार करून नितीनला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. जखमी नितीनला उपचारासाठी मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.