रुग्णवाहिकाच ठरली काळ, धडकेत हातठेला चालकाचा मृत्यू
By योगेश पांडे | Published: April 18, 2023 05:09 PM2023-04-18T17:09:03+5:302023-04-18T17:13:39+5:30
सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
नागपूर : एरवी रुग्णवाहिका ही लाईफलाईन ठरते, मात्र नागपुरातील एका हातठेलाचालकासाठी रुग्णवाहिका हीच डेथलाईन ठरली. भरधाव वेगातील रुग्णवाहिकेच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. शेख सलीम शेख रमजान पटेल (५९, मोठा ताजबागजवळ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला.
शेख सलीम शेख रमजान पटेल हे सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता शितला माता चौकाजवळील रस्त्याने हातठेला नेत होते. त्याचवेळी एमएच ४० बीएल ९९५८ ही रुग्णवाहिका भरधाव वेगाने आली. चालक संदेश सुरेश सुटे (२१, तलमले ले आऊट, बुटीबोरी) याचे रुग्णवाहिकेवरील नियंत्रण सुटले व त्याने थेट शेख सलीम यांना धडक दिली. वेग जास्त असल्याने रुग्णवाहिकेने आणखी एका ५० वर्षाच्या व्यक्तीलादेखील धडक दिली. या घटनेत शेख सलीम गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेडिकल इस्पितळात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेने कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचा मुलगा शेख ईरशाद शेख सलीम याच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलीस ठाण्यात चालक संदेशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.