नोकरीवरून काढल्याने ‘त्याने’ घेतली विहिरीत उडी; २४ तासांत आत्महत्येच्या चार घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 02:57 PM2023-02-06T14:57:27+5:302023-02-06T14:58:58+5:30
रागातून महिलेने घेतले विषारी औषध
नागपूर :नागपूर शहरात २४ तासांत दोन आत्महत्यांची नोंद झाली. नोकरीवरून काढल्याने तणावात असलेल्या एका व्यक्तीने विहिरीत उडी घेऊन जीव दिला, तर रागाच्या भरात एका विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. जरीपटका व कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या.
कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निवासी प्रशांत उत्तमराव भगत (४०, स्वर्णनगर) हे मानसिक आजाराने त्रस्त होते. त्यांना नोकरीवरून काढण्यात आले होते. यातून ते तणावात होते. त्रासाला कंटाळून त्यांनी शनिवारी मध्यरात्रीनंतर ऑटोमोटिव्ह चौकाजवळील एका विहिरीत उडी घेतली. त्यांचे प्रेत तरंगताना आढळल्याने ही बाब उघड झाली. त्यांच्या लहान भावाने दिलेल्या सूचनेवरून कपिलनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
दुसरी घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाली. सीमा कैलाश कनोजिया (३८, मिसाळ ले-आऊट, तथागत कॉलनी) यांनी शनिवारी दुपारी चार वाजता रागाच्या भरात घरात बेडरूममध्ये विष प्राशन केले. त्यांची प्रकृती खराब झाली. त्यांचे पती व मुलाने त्यांना उपचारासाठी इंदोरा चौक येथील एका इस्पितळात दाखल केले. उपचारादरम्यान रविवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पतीने दिलेल्या सूचनेवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
गळफास घेऊन दोघांची आत्महत्या
दरम्यान, शनिवारी पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत धीरज वसंता तराळे (३५, पंचशीलनगर) यांनी अज्ञात कारणावरून घरी कुणीच नसताना सिलिंग फॅनला दुपट्ट्याच्या सहाय्याने गळफास घेतला. त्यांच्या आईने दिलेल्या सूचनेवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. तर शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दीक्षा दिलीपसिंग भारद्वाज (२८, प्रेमनगर) हिनेदेखील अज्ञात कारणावरून गळफास घेतला. सकाळी ती बेडरूममध्ये सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिला मेयो इस्पितळात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.