सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लावला सव्वापाच लाखांचा चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 04:52 PM2021-12-05T16:52:14+5:302021-12-05T16:55:19+5:30
गुप्तचर संस्थेत सहायक म्हणून नोकरी लावून देण्याची थाप मारून एका ठगाने उच्चशिक्षीत तरुणाकडून चक्क सव्वापाच लाख रुपये उकळले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंटेलिजन्स ब्युरो (गुप्तचर संस्था)त नोकरी लावून देण्याची थाप मारून एका ठगबाजाने प्रतापनगरातील एका उच्चशिक्षीत तरुणाला सव्वापाच लाखांचा गंडा घातला. मोहनसिंग भवरसिंग राव (वय २५) असे आरोपीचे नाव असून तो राजस्थानमधील रतन सागर (सालिया सिरिही) येथील रहिवासी आहे.
शशिकांत बाळासाहेब बन्सोड (वय ३०) हा कामगार कॉलनी, सुभाषनगर येथे राहतो. तो उच्चशिक्षीत असून स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहे. त्याने जानेवारी-फेब्रुवारीमध्ये परीक्षा दिली होती. त्याच्या सोबतच्या मित्राच्या वडिलांनी चांगल्या नोकरीसाठी वशिलेबाजी आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांच्याच ओळखीतून ९ फेब्रुवारीला बन्सोडसोबत आरोपी मोहनसिंगचा संपर्क आला. त्याने गुप्तचर संस्थेत सहायक म्हणून नोकरी लावून देण्याची थाप बन्सोडला मारली.
त्यासाठी वेगवेगळ्या सबबी सांगून आधी दोन लाख, नंतर एक लाख, नंतर दोन लाख आणि त्यानंतर २५ हजार असे एकूण ५ लाख, २५ हजार रुपये उकळले. प्रत्यक्षात नोकरी लावून दिली नाही. त्याने दिलेल्या दोन्ही परीक्षेचा निकाल घोषित झाला. त्या यादीत बन्सोडचे नाव आले नाही. त्यामुळे बन्सोडने ठगबाज मोहनसिंगकडे नोकरीसाठी तगादा लावला. मात्र, नियुक्तीचा विषय काढताच वेगवेगळे कारण सांगून आरोपी पुन्हा पैशाची मागणी करत होता. त्यामुळे संशय आल्याने बन्सोडने आरोपीला आपली रक्कम परत मागितली असता ठगबाज मोहनसिंगने बन्सोडसोबत संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने बन्सोडने प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पीएसआय नीलेश कुलसंगे यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
अनेकांची फसवणूक
गुप्तचर संस्था, सैन्य दलात कुणाचेही लागेबांधे अथवा कितीही रक्कम खर्ची घालून नोकरी लागत नाही. सरकारी नियमानुसार आणि पात्रता असेल तरच संबंधिताना नोकरी मिळते. त्यासाठी आवश्यक त्या परीक्षा आणि प्रक्रिया पार पाडावी लागते, हे माहिती असूनही काही ठगबाज वशिला असल्याची थाप मारतात. या थापेबाजीला सुशिक्षीत तरुण बळीही पडतात. स्वत:चे नाव मोहनसिंग राव सांगणाऱ्या या ठगबाजाने अशाच प्रकारे अनेकांना गंडविले असावे, असा संशय आहे.