पैशांच्या वादातून मित्रानेच केली प्रॉपर्टी डीलरची हत्या; अग्रसेन चौकात मध्यरात्री थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 02:47 PM2023-02-09T14:47:37+5:302023-02-09T14:48:05+5:30

पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Man, four others booked for property dealer murder in Nagpur | पैशांच्या वादातून मित्रानेच केली प्रॉपर्टी डीलरची हत्या; अग्रसेन चौकात मध्यरात्री थरार

पैशांच्या वादातून मित्रानेच केली प्रॉपर्टी डीलरची हत्या; अग्रसेन चौकात मध्यरात्री थरार

googlenewsNext

नागपूर : शहरात हत्यांचे सत्र सुरूच असून, पैशांच्या वादातून मित्रानेच एका प्रॉपर्टी डीलरची हत्या केली. अग्रसेन चौकात मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. पाच आरोपींनी प्रॉपर्टी डीलरवर शस्त्रांनी वार करत ठार मारले. परवेश शेख उर्फ पापामिया शेख (३०, रोशनबाग, खरबी) असे मृत प्रॉपर्टी डीलरचे नाव आहे. या प्रकारामुळे अग्रसेन चौकासोबतच प्रॉपर्टी डीलर्समध्येही खळबळ उडाली आहे.

परवेझ उर्फ याकूब खान (२८, पारडी) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. परवेझ व पापामिया हे दोघेही मित्र होते व सोबत प्रॉपर्टी डीलिंगचे काम करायचे. ते प्रामुख्याने प्लॉट्सच्या विक्रीवर लक्ष द्यायचे. दोघांनी काही दिवसांपूर्वी एक भूखंड विकला होता. त्यातून आलेली कमिशनची रक्कम पापामियाला मिळणे बाकी होते. यावरून त्याचा परवेझशी वाददेखील झाला होता. परवेझने लवकरात लवकर पैसे परत देईन, असे आश्वासन दिले होते. परंतु, प्रत्यक्षात परवेझच्या मनात दुसराच कट शिजत होता. त्याने चार साथीदारांना सोबत घेतले व मंगळवारी रात्री १२च्या सुमारास अग्रसेन चौकात पोहोचला. तेथून त्याने पापामियाला फोन केला व तुझे पैसे परत द्यायचे आहेत. त्यामुळे लवकर अग्रसेन चौकात ये, असे सांगितले.

पैसे परत मिळणार, या आशेने पापामिया घरातून निघाला. मात्र, रात्रीची वेळ असल्याने त्याने सोबत कलीम शेख उर्फ करीम शेख या मित्रालादेखील घेतले. दोघेही दुचाकीने एक वाजताच्या सुमारास अग्रसेन चौकात पोहोचले. अग्रसेन भवनसमोर आरोपी व त्याचे साथीदार उभे होते. परवेझने पैसे परत न करता वाद घालण्यास सुरुवात केली. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. काही वेळातच परवेझ व त्याच्या साथीदारांनी दोघांवरही हल्ला केला.

पापामियाच्या मान, पोट, पाठीवर चाकूने वार करण्यात आले. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला दवाखान्यात नेण्याअगोदरच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मित्राने कसाबसा जीव वाचविला व थेट पोलिसांना याची माहिती दिली. तहसील पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत आरोपी तेथून फरार झाले होते. कलीमच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी परवेझला अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे.

Web Title: Man, four others booked for property dealer murder in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.