प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणारा वनविभागाच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2022 05:34 PM2022-06-22T17:34:49+5:302022-06-22T18:20:39+5:30
काळ्या जादूसाठी त्याने हे अवयव मिळविले होते व त्याची विक्री करणार होता, असे आरोपीकडून सांगण्यात आले.
नागपूर : वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या एका आराेपीला शहरातून अटक करण्यात आली. मयूर मधुसूदन गुप्ता (३३) असे आराेपीचे नाव असून, त्याच्याकडून वन्यजीवांच्या अवयवांसह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. काळ्या जादूसाठी त्याने हे अवयव मिळविले होते व त्याची विक्री करणार होता, असे आरोपीकडून सांगण्यात आले.
आराेपी मयूर हा वन्यजीवांची तस्करी करीत असल्याची गुप्त माहिती नागपूर वन विभागाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे सापळा रचून बनावट ग्राहक शहरातील शिवशंकर एजन्सी येथे पाठविण्यात आला. अवयव तस्करीची खात्री झाल्यानंतर धाड टाकून आराेपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून घोरपडीचे अवयव, समुद्री पंख, रंगमाही आदी अवयव जप्त करण्यात आले. आराेपीविराेधात वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
नागपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, उपवनसंरक्षक डाॅ. भारतसिंह हाडा, सहायक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे, सारिका वैरागडे तसेच नीलेश टवले, महादेव मुंडे, माराेती मुंडे, शुक्ला, खापर्डे, दिनेश शेंडे आदी कर्मचारी या कारवाईत सहभागी हाेते.