गोंडवाना एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी, आरोपी अटकेत; ४.२५ लाखांचा गांजा हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 03:44 PM2022-03-07T15:44:16+5:302022-03-07T16:14:11+5:30
विशाखापट्टनम येथून गांजा खरेदी करून तो विकण्यासाठी भोपाळला नेत असल्याची कबुली आरोपीने दिली.
नागपूर : होळीसाठी होत असलेली गांजा शौकीनांची मागणी पूर्ण करण्यासाठी ४ लाख २५ हजार रुपये किमतीचा ४२.१३० किलोग्रॅम गांजा विशाखापट्टनमहून भोपाळला नेत असताना लोहमार्ग पोलिसांनी एका आरोपीला रंगेहात अटक केली.
श्रीकृष्ण नोहबत सिंग (३४, कहराखुर्द, जि. आग्रा, उत्तरप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. तो रेल्वेगाडी क्रमांक १२४०९ गोंडवाना एक्स्प्रेसच्या कोच बी ३ मधून गांजाची तस्करी करीत असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांच्या नियंत्रण कक्षाने दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक मनीषा काशिद यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक संदीप गोंडाणे, दीपाली खरात, उपनिरीक्षक, विजय तायवाडे, ओमप्रकाश भलावी, अंमलदार योगेश घुरडे, भूपेश धोंगडी, रोशन मोगरे, विवेक चहांदे, संजय पटले, मुकेश नरुले आदी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर हजर झाले. त्यांनी गोंडवाना एक्स्प्रेसच्या कोच बी ३ ची तपासणी केली असता बर्थ १२ च्या खाली गांजाच्या ४ बॅग आढळल्या. हा गांजा ४२.१३० किलोग्रॅम असून बाजारभावानुसार त्याची किंमत ४.२५ लाख आहे. आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ कायदा ४२ (१) (२) नुसार कारवाई करण्यात आली. विशाखापट्टनम येथून गांजा खरेदी करून तो विकण्यासाठी भोपाळला नेत असल्याची कबुली आरोपीने दिली.
पहिल्यांदाच आरोपी सापडला
रेल्वेस्थानकावर अनेकदा गांजा पकडण्यात येतो. परंतू अनेक दिवसानंतर पहिल्यांदाच गांजा तस्करीतील आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. यात योगेश घुरडे आणि काही लोहमार्ग पोलीस गोंडवाना एक्स्प्रेस आऊटरवर असताना गाडीत चढले. त्यावेळी आरोपी कोचच्या दारावर उभा होता. गाडी प्लॅटफॉर्मवर थांबल्यानंतर आरोपी प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांच्या गर्दीत शिरला. परंतू योगेश घुरडे यांनी पाठलाग करून त्यास पकडले.