पत्नीला म्हणाले, घरी पोहोचतोय... अन् काही क्षणात आली मृत्यूची वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 11:07 AM2022-02-04T11:07:26+5:302022-02-04T11:17:58+5:30
बेपत्ता मुलीला शोधण्यासाठी बाहेर पडलेल्या बापाचा स्टार बसखाली येऊन अपघाती मृत्यू झाला. नागपुरातील गोंडवाना क्लबजवळ हा भीषण अपघात घडला. यामुळे काही वेळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.
नागपूर : बेपत्ता मुलीला शोधण्यासाठी बाहेर पडलेल्या एका व्यक्तीने पत्नीला बुधवारी रात्री फोन केला. लवकर घरी पोहोचतो, असे हताशपणे म्हणाले. पाच मिनिटांनंतर त्यांच्याच मोबाईलवरून एकाने त्यांच्या कुटुंबीयांना फोन करून त्यांचा अपघातीमृत्यू झाल्याची वार्ता कळविली.
मन सुन्न करणारी ही अवस्था सुरेंद्रगडमधील शर्मा कुटुंबीयांच्या वाट्याला आली असून, त्यामुळे कुटुंबीयांमध्येच नव्हे तर शेजाऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे. स्टार बसने चिरडल्याने दिनेश शर्मा (वय ४७, रा. सुरेंद्रगड) यांचा करुण अंत झाला. बुधवारी रात्री गोंडवाना क्लबजवळ हा भीषण अपघात घडला. यामुळे काही वेळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.
या अपघातानंतर उपरोक्त धक्कादायक माहिती पुढे आली. काही दिवसांपूर्वीच शर्मा यांची मुलगी बेपत्ता झाली आहे. त्यामुळे हे संपूर्ण कुटुंब हवालदिल आहे. मुलीचा पत्ता लावण्यासाठी शर्मा रोज विविध भागात पायपीट करीत होते. त्यांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले असावे, असाही संशय आहे. त्यानुषंगाने उलटसुलट चर्चा कानावर येत असल्यामुळे मुलीच्या चिंतेने शर्मा कमालीचे व्यथित होते.
बुधवारी रात्री त्यांनी पत्नीला फोन करून लवकरच घरी परत येतो, असे सांगितले. यावेळी पत्नी आणि लहान मुलगी तसेच मुलगा घरी होते. पती घरी येत असल्याचे कळाल्याने पत्नी स्वयंपाकात गुंतली. त्यानंतर काही वेळेतच त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची वार्ता त्यांच्या कुटुंबीयांना मिळाली. ती ऐकून त्यांची पत्नी बेशुद्धच पडली. शेजाऱ्यांनी त्यांना डॉक्टरकडे नेले.
कुटुंबीयांच्या उधरनिर्वाहाचा प्रश्न
विशेष म्हणजे, शर्मा त्यांच्या कुटुंबीयांचा एकमात्र आधार होते. पानटपरी चालवायचे. डेली कलेक्शनचेही काम करायचे.यातून त्यांच्या कुटुंबीयांचा घरखर्च चालायचा. या घटनेमुळे शर्मा कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या उधरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झाला आहे.