किरकोळ कारणातून साथीदाराचा खून करून विहिरीत फेकला मृतदेह; दोन आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2022 06:27 PM2022-11-14T18:27:47+5:302022-11-14T18:33:32+5:30
इमामवाडा पोलीस ठाण्याजवळील घटना; एकच खळबळ
नागपूर : किरकोळ वादातून दोन मजुरांनी आपल्याच साथीदाराचा खून करून मृतदेह विहिरीत फेकून दिला. इमामवाडा पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर घडलेल्या या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विहिरीत मृतदेह आढळून आल्यानंतर इमामवाडा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. रामसिंग ठाकूर (५५) असे मृतकाचे नाव आहे. तर राजू बुराडे आणि मुकेश अंबुरे अशी आरोपींची नावे आहेत.
रामसिंग आणि आरोपी मजूर म्हणून काम करतात व ते इमामवाडा संकुलातील झोपडपट्टीत राहतात. तिघांनाही दारूचे व्यसन आहे. शुक्रवारी रात्री रामसिंग आणि राजू यांच्यात काही कारणावरून वाद झाला. त्यामुळे संतापलेला राजू हा मुकेशसोबत रात्री उशिरा रामसिंगच्या झोपडीत आला. येथे पुन्हा वाद झाला. रामसिंगने त्याला झोपडी सोडण्यास सांगितले. प्रत्युत्तरात राजू व मुकेश यांनी रामसिंग यांच्या डोक्यात काठीने वार करून गंभीर जखमी केले. दोघेही तेथून पळून गेले. शनिवारी पहाटे दोघेही रामसिंगची प्रकृती जाणून घेण्यासाठी पोहोचले. तेव्हा रामसिंग मरण पावल्याचे त्यांना समजले. दोघांनी ओढत नेत त्याचा मृतदेह जवळच्या विहिरीत फेकून दिला. घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर इमामवाडा पोलीस ठाणे आहे. इमामवाडा पोलिसांनाही या घटनेची माहिती मिळू शकली नाही.
रविवारी सकाळी परिसरातील एका सलून कामगाराला विहिरीत मृतदेह तरंगताना दिसला. त्याने इमामवाडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. त्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून मेडिकलला पाठविण्यात आला. परिसरातीलच रहिवासी असल्याने रामसिंगची ओळख पटली. त्याच्या डोक्यावर खोल जखमा दिसत होत्या, त्यामुळे हत्येचा संशय व्यक्त केला जात होता.
पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. शवविच्छेदनात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. त्यांनी रामसिंगचे जवळचे नातेवाईक आणि शेजाऱ्यांकडे चौकशी केली. राजू आणि मुकेश यांच्यात वाद झाल्याचे त्यांना समजले. त्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्यांनी हत्येची कबुली दिली.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न
पोलीस आयुक्तांच्या सूचनेवरून गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी एरिया सर्व्हेलन्स टीम तयार करण्यात आली आहे. इमामवाडा हा गुन्हेगारीच्या दृष्टीने संवेदनशील परिसर आहे. खुनाची ही घटना पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर घडली. यानंतर ३६ तास उलटूनही पोलिसांना घटनेची माहिती मिळू शकली नाही. यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.