विहिरीवर मोटर लावताना वाद; तलवारीने वार करून चुलत भावाला संपविले
By दयानंद पाईकराव | Published: October 26, 2022 04:30 PM2022-10-26T16:30:53+5:302022-10-26T16:32:50+5:30
चौघांना अटक
नागपूर : विहिरीवर मोटर लावताना झालेल्या वादात तलवारीने वार करून चुलत भावाला ठार मारून त्याचा भाऊ आणि आई-वडिलांना गंभीर जखमी केल्याची घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी १२ ते १२.३० दरम्यान घडली आहे.
अभिषेक हरिओम शाहु (४०, गजानन चौक, जुनी शुक्रवारी) असे मृतकाचे नाव आहे. अभिषेकचे किराणा दुकान आहे. अभिषेकच्या शेजारीच त्याचा चुलतभाऊ आरोपी शुभम महेश शाहु (२१) राहतो. दोघांच्या घराची एकच भिंत आहे. दरम्यान ते दोघे एकाच विहिरीतून पाणी वापरतात. मृतक अभिषेकच्या घराचे बांधकाम सुरु असल्यामुळे त्याला पाणी अधिक लागत होते. दरम्यान आरोपी शुभमने विहिरीवर नवी मोटर लावली होती. मोटर लावण्यासाठी तो विहिरीवर चढला होता. त्यामुळे आरोपी शुभम आणि मृतक अभिषेकमध्ये जोरदार भांडण झाले. यात अभिषेकने घरातून तलवार आणली. परंतु शुभमने अभिषेकच्या हातातून तलवार हिसकावून त्याच्यावर वार केले.
अभिषेकला वाचविण्यासाठी त्याचा भाऊ सागर हरिओम शाहु (३५), वडिल हरिओम शाहु (७०) आणि आई सरला शाहु (६६) मध्ये गेले असता ते सुद्धा गंभीर जखमी झाले. भांडण सुरु असताना दिपांशु महेश शाहु (१९), रजनी महेश शाहु (३५) आणि करिश्मा शाहु (२१) हे आरोपी शुभमच्या मदतीला धाऊन गेले. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटक केली आहे. जखमींना मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अभिषेक शाहुचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलमध्ये पाठविण्यात आला आहे.