हॅलो, मी बॅंकेतून बोलतोय, तुमचा ओटीपी सांगा; खातेदाराला साडेचार लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 12:50 PM2021-12-13T12:50:06+5:302021-12-13T13:31:36+5:30
बँकेचे क्रेडिट कार्ड बंद करावयाचे असल्यास माेबाईलवर प्राप्त झालेला ‘ओटीपी’सांगा, अशी बतावणी करीत अनाेळखी व्यक्तीने गाेपनीय माहिती जाणून घेतली. व खातेदाराच्या बँक खात्यातून साडेचार लाख रुपयांची परस्पर खरेदी करीत फसवणूक केली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या बँक खात्याशी संबंधित कुठलीही माहिती, पासवर्ड, ओटीपी ही कधीच कुणाला देऊ नये. त्याचा वापर करून सायबर गुन्हेगार तुमचं बँक खात रिकामं करू शकतात. हा प्रकार उमरेड शहरात नुकताच असा प्रकार घडला असून, प्रकरण पाेलिसात पाेहाेचले आहे.
बँकेचे क्रेडिट कार्ड बंद करावयाचे असल्यास आताच बंद करा. त्यासाठी माेबाईल फाेनवर प्राप्त झालेला ‘ओटीपी’सांगा, अशी बतावणी करीत अनाेळखी व्यक्तीने फाेनवर गाेपनीय माहिती जाणून घेतली. त्याच माहितीचा वापर करीत खातेदाराच्या बँक खात्यातून ४ लाख ७२ हजार ४८९ रुपयांची परस्पर खरेदी करीत फसवणूक केली.
प्रवीण केशव लाडेकर (४०, रा. मंगळवारी पेठ, उमरेड) यांचे भारतीय स्टेट बँकेत खाते असून, त्यांच्याकडे याच बँकेचे क्रेडिट व डेबिट कार्ड आहेत. त्यांना निनावी फाेन काॅलवर आपण बँक अधिकारी बाेलत असल्याचे सांगण्यात आले. तुमच्या क्रेडिट कार्डवर २७ हजार रुपये बाकी आहेत. तुमचे कार्ड बंद करावयाचे असल्यास सांगा, ते लगेच बंद करून देताे, अशी सूचनाही त्या व्यक्तीने प्रवीण लाडेकर यांना केली. त्यावर प्रवीण लाडेकर यांनी विश्वास ठेवला व त्या व्यक्तीने माेबाईल फाेनवर प्राप्त झालेला ओटीपी मागताच प्रवीण लाडेकर यांनी ताे ओटीपीही त्या व्यक्तीला सांगितला. त्यावर तुमचे कार्ड बंद करावयाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. तुमच्या पत्त्यावर ‘एनओसी’ येईल, असे सांगून त्या व्यक्तीने फाेन बंद केला.
त्या व्यक्तीने प्रवीण लाडेकर यांच्या क्रेडिट कार्डचा वापर करीत ४ लाख ७२ हजार ४८९ रुपयांची परस्पर खरेदी केल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत जाऊन चाैकशी केली. त्यावर दरमहा ३९ हजार रुपयांचा हप्ता भरणे अनिवार्य असल्याचे त्यांना सांगण्यात आले. शिवाय, क्रेडिट कार्डबाबत चाैकशी करण्यासाठी किंवा ओटीपी मागण्यासाठी बँकेकडून कुणीही कधीच फाेन केला नसल्याचेही तसेच माेबाईल फाेनवर ओटीपी पाठविला नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.
या प्रकारात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४२०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम सहकलम ६६ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.