साडेचार कोटींचे कर्ज मिळवण्याच्या नादात ४६ लाख गमावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2022 03:25 PM2022-02-07T15:25:19+5:302022-02-07T15:33:04+5:30
तुम्हाला ४ कोटी, ५० लाखांचे गृहकर्ज झटपट मिळवून देतो, असे सांगून आरोपी माडवारने ३० जुलैपासून बँक कर्जाचे करारनामे (दस्तावेज) नोंदवावे लागतील असे सांगितले. त्यासाठी मारशेट्टीवार यांच्याकडून १४ लाख, ८५०० रुपये घेतले.
नागपूर : साडेचार कोटींचे कर्ज मंजूर झाल्याची थाप मारून एका आरोपीने रामेश्वरीतील व्यावसायिकाचे १४ लाख हडपले. एवढेच नव्हे तर विक्रीपत्रांची नोंदणी करण्यासाठी ३२ लाखांची स्टॅम्प ड्यूटीही भरण्यास भाग पाडले. याप्रकरणी बजाजनगर पोलीस ठाण्यात रोहित भय्याजी माडवार (वय ४५, रा. मेघदूत हुडकेश्वर) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
रामेश्वरीतील व्यावसायिक दिनेश दामोदर मारशेट्टीवार यांच्याशी दोन वर्षांपूर्वी आरोपी माडवारची भेट झाली. आपली एनजीओ असून अनेक बँक अधिकाऱ्यांशी आपले चांगले संबंध असल्याची थाप त्याने मारली. तुम्हाला ४ कोटी, ५० लाखांचे गृहकर्ज झटपट मिळवून देतो, असे सांगून आरोपी माडवारने ३० जुलैपासून बँक कर्जाचे करारनामे (दस्तावेज) नोंदवावे लागतील असे सांगितले. त्यासाठी मारशेट्टीवार यांच्याकडून १४ लाख, ८५०० रुपये घेतले. त्यानंतर बँकेचे ४ कोटी, ५० लाखांचे तीन बनावट धनादेश तयार करून त्याचे फोटो तसेच कर्जमंजुरीचे बनावट पत्र त्यांना दिले. त्यावर विश्वास ठेवून आपल्या तीन मालमत्तांचे विक्रीपत्र लावले. त्याला बँकेचे ते तीन (बनावट) धनादेशही जोडले.
विक्रीपत्रांसाठी ३२ लाख, ४२०० रुपयांचा खर्च (स्टॅम्प ड्युटी) आला. दरम्यान, त्यांनी विक्रीपत्राला संल्गन केलेले तीनही धनादेश बनावट असल्याचे अधिकाऱ्यांनी मारशेट्टीवार यांच्या लक्षात आणून दिले. ३० जुलै ते २५ नोव्हेंबर २०२० दरम्यान ही बनवाबनवी माडवारने केली. ती उघड झाल्यानंतर मारशेट्टीवारने आरोपी माडवारकडे आपली रक्कम परत मागितली. मात्र, त्याने तीसुद्धा परत केली नाही. परिणामी, मारशेट्टीवार यांनी बजाजनगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीची चाैकशी केली जात आहे.