'तिचा' हरविलेला पती पोलिसांनी कागदावरच शोधला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2022 12:17 PM2022-05-28T12:17:34+5:302022-05-28T12:21:21+5:30
नरेश परत आले नसताना पोलिसांनी परत आल्याची नोंद पोलीस ठाण्यात केली कशी, असा दीपालीचा प्रश्न आहे. तत्कालीन ठाणेदारांनी केस पेंडिंग राहू नये म्हणून खोटी माहिती लिहिली असल्याचा आरोप तिने केला आहे.
जलालखेडा (नागपूर) : मदना येथील नरेश बाबाराव जाणे (४५) हे २०१६ पासून बेपत्ता आहेत. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी जलालखेडा पोलिसात तक्रारही दाखल केली होती. मात्र, केस पेंडिंग राहू नये म्हणून तक्रार झाल्याच्या १५ दिवसातच नरेश जाणे मिळाल्याची नोंद पोलीस दफ्तरी असल्याने नरेशची पत्नी दीपाली आज शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मदना येथील नरेश बाबाराव जाणे हे खासगी वाहनावर चालक होते. ३० सप्टेंबर २०१६ रोजी ते कामानिमित्त बाहेर गेले असता, घरी परत आलेच नाहीत. त्यांचा संपर्क होत नसल्याने घरच्यांनी शेवटी १३ ऑक्टोबर २०१६ रोजी जलालखेडा पोलीस ठाण्यात नरेश बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. ६ वर्ष उलटूनसुद्धा नरेशचा शोध लागलेला नाही. २०२२ मध्ये दीपालीच्या पतीच्या नावाने घरकुल आले. त्यासाठी पती व पत्नीच्या नावाचे संयुक्त बँक खाते उखडणे गरजेचे आहे; मात्र पती हरविला असल्यामुळे सह्या होऊ शकत नसल्याने पासबूक निघू शकत नाही, असे दीपाली हिला बँकेच्यावतीने सांगण्यात आले.
त्यावर पर्याय म्हणून बँक कर्मचाऱ्यांनी नरेश हरविल्याची पोलीस ठाण्यात नोंद असल्याचे कागदपत्र आणण्यासाठी तिला सांगितले. यानंतर दीपाली जलालखेडा पोलीस स्टेशन येथे गेली असता, तिचे पती तक्रार दिल्यानंतर आठ दिवसात परत आल्याची नोंद ठाण्यात आहे. त्यामुळे तुमचे पती हरविले असल्याबाबत आम्ही तुम्हाला लिहून देऊ शकत नसल्याचे पोलिसांनी दीपालीला सांगितले. नरेश परत आले नसताना पोलिसांनी परत आल्याची नोंद पोलीस ठाण्यात केली कशी, असा दीपालीचा प्रश्न आहे. तत्कालीन ठाणेदारांनी केस पेंडिंग राहू नये म्हणून खोटी माहिती लिहिली असल्याचा आरोप तिने केला आहे.
माझे पती नरेश जाणे हे ६ वर्षांपासून बेपत्ता आहेत. घरकुल योजनेत आमचे नाव आल्यामुळे पोलीस ठाण्यातून पती हरविले असल्याचे लेखी कागदपत्र हवे होते. मात्र, पोलिसांच्या लेखी माझे पती परत आले आहेत. ते आलेच नाही तर पोलिसांनी खोटी नोंद कोणत्या आधारावर केली?
दीपाली जाणे, मदना
महिलेच्या सांगण्यावरून तिचे पती परत आले नाही; परंतु, मी या प्रकरणाची शहनिशा केली असता, नरेश जाणे परत आल्याची नोंद पोलीस ठाण्यात आहे. २०१६ चे प्रकरण आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.
मनोज चौधरी, ठाणेदार, जलालखेडा