‘ऑनलाईन’ सिमेंट मागविणे पडले महागात, सायबर गुन्हेगारांकडून दोन लाखांचा चुना

By योगेश पांडे | Published: April 11, 2023 04:39 PM2023-04-11T16:39:42+5:302023-04-11T16:40:07+5:30

वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

man order cement online, duped by 2 lakh from cyber fraudsters | ‘ऑनलाईन’ सिमेंट मागविणे पडले महागात, सायबर गुन्हेगारांकडून दोन लाखांचा चुना

‘ऑनलाईन’ सिमेंट मागविणे पडले महागात, सायबर गुन्हेगारांकडून दोन लाखांचा चुना

googlenewsNext

नागपूर : नामांकित सिमेंट कंपनीचा अधिकारी समजून ‘ऑनलाईन’ सिमेंट मागविणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. सायबर गुन्हेगारांनी दोन लाखांचा चुना लावला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

क्लिनिकल रिसर्चचे काम करणारे नितीन प्रकाश दयानी (३७, शिवम टॉवर, सतनामी ले आऊट) यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यांना सिमेंटची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी डालमिया सिमेंट कंपनीच्या नावाने इंटरनेटवर ‘सर्च’ केले. डालमिया सिमेंटच्या नावाने एक संकेतस्थळ उघडले व त्यात दीपक अग्रवाल याचा क्रमांक दिला होता. नितीन यांनी त्याला फोन लावला असता त्याने तो डालमिया सिमेंट कंपनीत असिस्टंट सेल्स मॅनेजर असल्याचे सांगितले.

नितीन यांनी ७०० बॅग्ज घेण्याची इच्छा प्रदर्शित केली व त्याला पैसे कसे द्यायचे याची विचारणा केली. त्याने यस बॅंकेचा खातेक्रमांक दिला. तसेच ‘जीएसटी’ क्रमांकदेखील दिला. नितीन यांनी ऑनलाईन तपासले असता तो ‘जीएसटी’ क्रमांक संबंधित कंपनीचा असल्याचे दाखविल्या जात होते. यानंतर नितीन यांचा त्याच्यावर विश्वास बसला व त्यांनी दोन लाख रुपये भरले. मात्र त्यानंतर सिमेंटदेखील आले नाही व संबंधित मोबाईल क्रमांकदेखील बंद होता. आपली फसवणूक झाल्याचे नितीन यांना लक्षात आले व त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून वाठोडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: man order cement online, duped by 2 lakh from cyber fraudsters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.