५०० ची बनावट नोट देऊन २० चा नाश्ता, उरलेले पैसे खिशात घालायचा; असा अडकला जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2022 04:08 PM2022-12-09T16:08:53+5:302022-12-09T17:16:46+5:30
आरोपीला अटक : नागपुरात बनावट नोटांचे ‘रॅकेट’?
नागपूर : बाजारात बनावट नोटांच्या माध्यमातून खरेदी करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित व्यक्ती पाचशे रुपयांची बनावट नोट देऊन २० रुपयांचा नाश्ता करायचा व उरलेले सुटे पैसे घेऊन निघून जायचा. एका खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. नागपुरात अशा पद्धतीने बनावट नोटांचे रॅकेट सुरू आहे का, या दृष्टीने पोलिसांकडून शोध सुरू आहे.
मंगळवारी, सदर बाजार मार्ग येथे शम्मी रामप्यारे गुप्ता यांचे खाद्यपदार्थांचे दुकान आहे. २२ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री १० वाजता त्यांच्याकडे एक ग्राहक आला व त्याने २० रुपयांचा नाश्ता घेतला. त्याने गुप्ता यांना पाचशेची नोट दिली व गुप्ता यांनी त्याला ४८० रुपये परत दिले. २९ नोव्हेंबर रोजी तो परत आला व त्याने तसाच प्रकार केला. गुप्ता यांना त्याच्यावर संशय आला होता, परंतु गर्दी जास्त असल्यामुळे ते त्याला विचारणा करण्याअगोदर तो निघून गेला.
६ डिसेंबर रोजी तो ग्राहक परत आला. गुप्ता यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अगोदरच कल्पना देऊन ठेवली होती. मागील दोन वेळेप्रमाणे ग्राहकाने २० रुपयांचा नाश्ता केला व पाचशे रुपये दिले. गुप्ता यांनी त्याला ओळखले व कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला पकडून ठेवले. त्यांनी सदर पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी येऊन संबंधित ग्राहकाला ताब्यात घेतले. तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र, पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने त्याचे नाव विजय दशरत थोराईत (४२, बैरामजी टाऊन) असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे.
बटाटे खरेदी करताना कळले सत्य
पहिल्यांदा आरोपीने दिलेली नोट थोडी जाड वाटत असल्याने गुप्ता यांनी ती बाजूला ठेवली व ते दुसऱ्या दिवशी बाजारात बटाटे खरेदी करायला गेले होते. बटाटे खरेदी केल्यावर ती नोट त्यांनी भाजीविक्रेत्याला दिली. मात्र, ती नोट खोटी असल्याचे म्हणत भाजीविक्रेत्याने ती परत केली होती. कामाच्या गडबडीत गुप्ता यांच्याकडून ती नोट हरविली.