आजोबांची कमाल! वयाच्या शंभराव्या वर्षी पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 04:08 PM2022-01-05T16:08:28+5:302022-01-05T16:48:52+5:30
आजोबांना १७ व्या वर्षापासूनच कविता लिहिण्याचा छंद होता. मात्र, त्यांनी त्याचा कवितासंग्रह प्रकाशित केला नव्हता. तर आता वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले असून नववर्षदिनी काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला.
नागपूर : या जगात प्रत्येकाला काही ना काही छंद असतोच. कुणाला चित्र काढण्याचा, क्रिकेट खेळायचा, गाण्याचा, नाचण्याचा पण तो छंद आयुष्यभर जपणारे काहीच. एका आजोबांनी आपला कविता लिहिण्याचा छंद जोपासला आणि वयाच्या शंभरीत आपले पहिले कवितासंग्रह प्रकाशित केले. या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नववर्षदिनी पार पडला.
कृष्णराव माधवराव दळवी यांचा जन्म १ जानेवारी १९२३ चा भंडारा जिल्ह्यातील पवनी येथचा. १ जानेवारी २०२२ रोजी त्यांनी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले. ते भारत सरकारच्या सिव्हिल डिफेन्स (नेव्ही) विभागातून क्लास वन अधिकारी म्हणून निवृत्त झाले. आपल्या आयुष्यातील आलेले अनुभव व मनात संचारणाऱ्या कल्पनांना त्यांनी कवितांचे आवरण चढवले.
कृष्णराव यांना कविता लिहिण्याचा छंद वयाच्या १७व्या वर्षापासूनच होता. मात्र, त्या प्रकाशित करण्याचा मानस त्यांनी कधीच व्यक्त केलेला नव्हता. त्यामुळे त्यांचा हा शतक पदार्पण सोहळा संस्मरणीय करण्याची कल्पना स्नुषा डॉ. अपर्णा दळवी, मुलगा दीपक दळवी यांच्या मनात आली. त्याअनुषंगाने कृष्णराव यांच्या निवडक ७५ कवितांचा संग्रह ‘मर्मध्वनी’ साकारण्याची कल्पना आली आणि मिलिंद हरदास यांनी प्रकाशनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली.
त्याअनुषंगाने १ जानेवारी २०२२ रोजी वयाच्या शतक पदार्पण सोहळ्यात या काव्यसंग्रहाचे प्रकाशन वैशाली मुलमुले यांच्या हस्ते करण्यात आले. वयाच्या शंभराव्या वर्षी आयुष्यभर रचलेल्या कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित होणे, हा एक दुर्मिळ योग ठरला. हा सोहळा शंकरपूर येथील बालाजी मंदिरात पार पडला. यावेळी अंजली पाठक, डॉ. उदय नारलावार यांच्यासह कौटुंबिक मंडळी उपस्थित होती.