बनावट नकाशा तयार करत स्वत:च्याच कंपनीला विकली साडेचार कोटींची जमीन
By योगेश पांडे | Published: August 23, 2023 05:49 PM2023-08-23T17:49:08+5:302023-08-23T17:49:54+5:30
नासुप्रच्या अधिकाऱ्याची बोगस स्वाक्षरी, तयार केला खोटा नकाशा : बनावट सचिवासह व्हाईटकॉलर आरोपींविरोधात गुन्हा दाखल
नागपूर : एका ठकबाजाने गृहनिर्माण संस्थेचा बोगस सचिव बनून स्वत:च स्थापन केलेल्या एका बांधकाम कंपनीला संस्थेची जमीन साडेचार कोटींना विकली. तसेच त्याने नासुप्रच्या अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून खोटा नकाशादेखील तयार केला. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी चार व्हाईटकॉलर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
१९७१ साली श्रीप्रकाश गृहनिर्माण सहकारी संस्थेची नोंदणी झाली होती व संस्थएने मौजा सोमलवाडा येथे जमीन घेतली होती. प्रशांत बागडदेव या आरोीने २००७ साली स्वत:ला सचिव दाखवून दोन प्लॉट्सची परस्पर विक्री केली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल झआला होता व ते प्लॉट परत संस्थेच्या नावे झाले होते. २०१८ साली बागडदेवने प्रोजेक्सिक बिल्डकॉन प्रा.लि.ही कंपनी स्थापन केली. त्यात काजल दिक्षीत, संध्या प्रशांत बागडदेव हे पार्टनर होते. फेब्रुवारी २०१८ मध्ये त्याने संस्थेचे दोन प्लॉट त्याच कंपनीला विकले व कंपनीच्या वतीने काजल व संध्याने स्वाक्षरी केली. तर एक प्लॉट त्याने श्यामसुंदर बिल्डकॉन प्रा.लि.चा संचालक अभिजीतसिंह ठाकूर याला विकला.
हे प्लॉट त्याने ४.५२ कोटींना विकल्याचे दाखविले. प्रत्यक्षात नासुप्रच्या मूळ नकाशात ते दोन प्लॉटच नव्हते. बागडदेवने नकाशात फेरफार केली व स्वत:च नासुप्र अधिकाऱ्याची बोगस स्वाक्षरी केली. त्याने बनावट नकाशात खुल्या जागेला प्लॉट दाखविले व तोच नकाशा विक्रीपत्रात जोडला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष रामनाथ बळीराम काळसर्पे यांच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलीस ठाण्यात चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट पॅनच्या आधारे उघडले संस्थेचे दुसरे खाते
प्रशांत बागडदेव याने संस्थेच्या नावाने बनावट पॅन कार्ड तयार केले व त्याच्या आधारे पुसद अर्बन सहकारी बॅंकेत संस्थेचे दुसरे खाते उघडले. तो संस्थेच्या कोणत्याही पदावर नसताना त्याने स्वत:ला कागदोपत्री संस्थेचा सचिव दाखविले व ४.५२ कोटींची रक्कम स्वत:च्या खात्यात वळती केली. मार्च महिन्यात आयकर खात्याची नोटीस आल्यानंतर ही बाब उघडकीस आली.