मती फिरली अन् रेल्वेत चोरी केली; पोलिसांनी केले जेरबंद
By नरेश डोंगरे | Updated: April 7, 2025 21:47 IST2025-04-07T21:46:14+5:302025-04-07T21:47:23+5:30
गावाला जाण्याऐवजी पोहचला कोठडीत

मती फिरली अन् रेल्वेत चोरी केली; पोलिसांनी केले जेरबंद
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : कार्यालयीन काम आटोपल्यानंतर गावाला परत जाण्याच्या तयारीत असताना त्याची मती फिरली. त्याने रेल्वेत चोरी केली अन् आता तो पोलिसांच्या कोठडीत पोहचला.
गोपाल सदाशिव कडके (वय २५) असे नाव असलेला अल्लीपूर (जि. वर्धा) येथील तरुण ५ एप्रिलला नागपुरात आला होता. नागपुरातील कामकाज आटोपल्यानंतर तो गावाला परत जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर पोहचला. ट्रेन नंबर १२६२४ चेन्नई सेंट्रल मेलच्या कोच नंबर बी-१ मध्ये पोहचला. या कोचमध्ये असलम अब्दुल हमीद खान (वय ५४) यांची मुलगी नागपूरहून विजयवाडा येथे जाण्यासाठी बसली होती. तीने आपली कॉलेज बॅग बर्थ क्रमांक ६३ वर ठेवली. बॅगमध्ये दीड लाख रुपये किंमतीचा आयपॅड, हेडफोन आणि रोख ५०० रुपये होते. या बॅगवर गोपालची नजर पडली अन् त्याची मती फिरली. त्याने ती बॅग उचलली आणि ट्रेनने वर्धा जाण्याचे कॅन्सल करून तो रेल्वे स्थानकाबाहेर पडला.
दरम्यान, बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीने तिच्या वडिलांना माहिती दिली. त्यावरून खान यांनी रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून आरोपीला शोधण्यासाठी गाडी फलाट क्रमांक दोनवरून सुटण्यापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले. नमूद गाडीच्या कोचमधून निळा जिन्स आणि काळा शर्ट घातलेला एक तरुण बाहेर पडताना दिसला. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तो धागा पकडून शोधाशोध केली आणि आरोपीला गणेशपेठ बस स्थानकानजिकच्या राहूल हॉटेलजवळ आज ताब्यात घेतले. चाैकशीत त्याच्याजवळून चोरीची बॅग आणि आयपॅडसह अन्य साहित्यही जप्त केले. चोरीच्या आरोपात अटक करण्यात आलेला आरोपी कडके याचा कोणताही क्राईम रेकॉर्ड नसल्याचे रेल्वेचे पोलीस सांगतात. ऐनवेळी मती फिरल्यामुळे बॅग उचलून तो पळून गेल्याचे प्राथमिक चाैकशीत त्याने रेल्वे पोलिसांना सांगितले आहे.
तत्परतेने लावला छडा
चोरीची तक्रार दाखल झाल्यानंतर चोरीच्या घटनेचा तत्परतेने छडा लावून आरोपीला जेरबंद करण्याची कामगिरी रेल्वेच्या पोलीस अधीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी पांडूरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गाैरव गावंडे यांच्या नेतृत्वात हवलदार पुष्पराज मिश्रा, तपासी अंमलदार भोयर, अमोल हिंगणे, प्रवीण खवसे आणि अजहर अली यांनी ही कामगिरी बजावली.