विषारी साप चावल्यानंतरही 'तो' नाकारातच होता; डॉक्टरांचे प्रसंगावधान, पती-पत्नीचे वाचले प्राण
By सुमेध वाघमार | Published: June 8, 2023 06:38 PM2023-06-08T18:38:11+5:302023-06-08T18:39:23+5:30
डॉक्टरांनी वेळ न घालविता आपल्या अनुभवाच्या बळावर त्या दृष्टीने उपचाराला सुरूवात केली. पुढील ३२ तास त्याच्यावर शर्थीचे उपचार केले.
नागपूर : पत्नीला साप चावल्याने पतीने तिला मेडिकलमध्ये दाखल केले. उपचाराला सुरूवात झाली. काही वेळेनंतर पतीलाही अस्वस्थ वाटू लागले. सापाने दंश केले का, असे डॉक्टरांनी विचारले. परंतु पतीने नाकारले. व्हेंटिलेटर लावण्यापर्यंत पतीची प्रकृती गंभीर झाली, तरी साप चावल्याचे तो नाकारत होता. मात्र, त्याची लक्षणे पाहून डॉक्टरांना खात्री पटली. त्या दिशेन उपचाराला सुरुवात केली. ३२ तासांच्या शर्थीच्या उपचारानंतर पतीसोबतच पत्नीचेही प्राण वाचविले.
कामठी रोडवरील खसाडा नाकाजवळील विट भट्टीत ४० वर्षीय पत्नी रुखमिनीबाई आणि ४५ वर्षीय पती पुरण मजूर म्हणून कामाला आहेत. ४ जून रोजी दिवसभर काम करून ते आपल्या झोपडीत झोपले होते. पहाटे २.३० वाजताच्या सुमारास पत्नी किंचाळून जागी झाली. पतीही दचकून उठला. त्यांच्या पलंगावर साप होता. पत्नीला साप चावल्याचे पाहता पतीने लागलीच मेडिकलच्या कॅज्युअल्टीमध्ये दाखल केले.
डॉक्टरांनी उपचाराला सुरुवात केली. एकाच पलंगावर दोघेही झोपले असल्याने, डॉक्टरांनी सहज म्हणून तुम्हाला साप चावला नाही का, असे पतीला विचारले. परंतु त्याने नाकारले. पहाटे ५ वाजताच्या सुमारास पतीला छातीत दुखत असल्याची तक्रार सुरू झाली. डॉक्टरांनी त्याला तपासून ईसीजी काढून घेतला. त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. डॉक्टरांनी पुन्हा त्याला साप चावला का, कुठे सूज आली का, असा प्रश्न केला. परंतु त्याची नकार घंटा सुरूच होती. तरीही डॉक्टरांनी त्याला निरीक्षणाखाली ठेवले.
सकाळी ७ वाजताच्या सुमारास त्याला श्वास घेण्याचा त्रास सुरू झाला. व्हेंटिलेटर लावण्याची वेळ आली तरी तो नाकारतच होत. त्याची सर्पदंशाची लक्षणे सूचक होती. डॉक्टरांनी वेळ न घालविता आपल्या अनुभवाच्या बळावर त्या दृष्टीने उपचाराला सुरूवात केली. पुढील ३२ तास त्याच्यावर शर्थीचे उपचार केले. तो धोक्याबाहेर आला. व्हेंटिलटर काढून त्याला सामान्य वॉर्डात दाखल केले. सध्या पती-पत्नी दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
या रुग्णांवर मेडिकलच्या मेडिसीन विभागाचे डॉ. मिलिंद व्यवहारे व डॉ प्रवीण शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. आशिष, डॉ. रामकिशन, डॉ. अस्मिता, डॉ. श्रुतिका, डॉ. भाग्यश्री, डॉ. रुषिकेश, डॉ. पंकज आणि डॉ. हरीश यांनी विशेष परिश्रम घेऊन दोघांचेही जीव वाचविले. धक्कादायक म्हणजे, पती मृत्यूचा दारातून बाहेर आला तरी तो साप चावल्याचा घटनेला नाकारतच आहे