‘मन की बात’ थेट ‘दिल से’ : आज ‘प्रपोज डे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 12:44 AM2019-02-08T00:44:07+5:302019-02-08T00:45:35+5:30
केवळ ‘तू मला आवडतेस’ हे सांगण्यासाठी प्रियकर ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर...’च्या ‘स्टाईल’मध्ये ‘लव्ह लेटर’ लिहावे व ते प्रेयसीला कुणाच्या तरी माध्यमातून द्यावे, हे चलन काळासोबत मागे पडताना दिसत आहे. आता तर ‘हायटेक’ जमान्यात थेट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ‘प्रपोज’ करण्यावर तरुणाईचा भर दिसून येत आहे. तऱ्हा कुठलीही असो मात्र सर्वांची प्रेमाची भावना सारखीच असते, अगदी त्या ओळींसारखी ‘प्रेम हे प्रेम असते तुमचे नी आमचे सेम असते’.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केवळ ‘तू मला आवडतेस’ हे सांगण्यासाठी प्रियकर ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर...’च्या ‘स्टाईल’मध्ये ‘लव्ह लेटर’ लिहावे व ते प्रेयसीला कुणाच्या तरी माध्यमातून द्यावे, हे चलन काळासोबत मागे पडताना दिसत आहे. आता तर ‘हायटेक’ जमान्यात थेट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ‘प्रपोज’ करण्यावर तरुणाईचा भर दिसून येत आहे. तऱ्हा कुठलीही असो मात्र सर्वांची प्रेमाची भावना सारखीच असते, अगदी त्या ओळींसारखी ‘प्रेम हे प्रेम असते तुमचे नी आमचे सेम असते’.
‘व्हॅलेन्टाईन वीक’मध्ये पहिल्या दिवशी ‘रोज डे’ झाल्यानंतर प्रेमवीरांना प्रतीक्षा असते ती ‘प्रपोज डे’ची. आपल्या मनातील भावना सांगण्यासाठी प्रेमात पडलेले लोक या दिवसाची वाट पाहतात. त्यासाठी त्यांचे मित्र मैत्रिणीदेखील चांगली ‘फिल्डींग’ लावून ‘मदत’ करत असतात. चांगली तयारी करुन, कधी कधी पाठांतर केलेले संवाद बोलून, चांगलं गिफ्ट घेऊन त्या आवडत्या व्यक्तीला ‘प्रपोज’ केलं जातं. तिने होकार द्यावा यासाठी भरपूर प्रयत्न केले जातात. ‘प्रपोज डे’चे निमित्त साधून आपण आपल्या मनातली भावना बोलून दाखवली, याचं समाधान प्रपोज करणाऱ्याच्या मनात असते.
‘प्रपोज’ करण्याच्या नव्या पद्धती
- विविध ‘अॅप्स’च्या माध्यमातून ‘व्हिडीओ’च्या माध्यमातून मनातील भावना मांडणे
- ‘ऑनलाईन शॉपिंग’च्या माध्यमातून आवडत्या व्यक्तीपर्यंत ‘गिफ्ट’ व सोबतच पत्र पोहोचविणे
- ‘व्हॉट्सअॅप’वर शब्द नव्हे तर ‘इमोजी’तून भावना कळविणे
- सांकेतिक भाषा किंवा दुसऱ्या देशाच्या भाषेतून भावना पोहोचविणे
- ‘पेन ड्राईव्ह’च्या माध्यमातून ‘रेकॉर्डेड प्रपोज’ करणे
कुणावरही ‘फोर्स’ नको
‘प्रपोज’ करणे म्हणजे मनातील प्रेमाची भावना समोरच्याला सांगणे असा होतो. मात्र समोरच्या व्यक्तीला ती भावना ऐकूनच घ्यायची नसेल किंवा ती व्यक्ती कुठल्या कामात व्यस्त असेल तर ‘फोर्स’ करण्याची आवश्यकता नाही. आवडत्या व्यक्तीच्या कलाकलाने घेणे महत्त्वाचे असते. जर पुढील व्यक्तीकडून नकार आला तर तो पचविण्याची तयारी हवी. एका नकारामुळे आयुष्य उद्ध्वस्त होत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. प्रेम जीव लावायला शिकविते, जीव घ्यायला किंवा द्यायला नाही हे विसरू नका.