जीर्ण कार्यालयातून चालताे ‘जीवनोन्नती’चा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:41 AM2021-02-05T04:41:05+5:302021-02-05T04:41:05+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : ग्रामीण भागातील गरीब व तळागाळातील नागरिकांना शेतीविषयक प्रशिक्षण देऊन त्यांना राेजगार मिळावा, राज्य शासनाने ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : ग्रामीण भागातील गरीब व तळागाळातील नागरिकांना शेतीविषयक प्रशिक्षण देऊन त्यांना राेजगार मिळावा, राज्य शासनाने ग्रामविकास मंत्रालयांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) राज्यभर राबवायला सुरुवात केली आहे. या अभियानाने नरखेड शहरात कार्यालय सुरू करण्यात आले असून, त्या कार्यालयाकडे संपूर्ण नरखेड तालुक्याचा कारभार साेपविण्यात आला आहे. या अभियानाचे नरखेड शहरातील कार्यालय अत्यंत माेडकळीस आलेल्या इमारतीत थाटण्यात आले आहे. या प्रकाराकडे प्रशासनासह स्थानिक लाेकप्रतिनिधींनीही कानाडाेळा केला आहे.
ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने पंचायत राज व्यवस्थेत पंचायत समिती कार्यालयाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. याच कार्यालयामार्फत समाजातील अविकसित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना विविध बाबींची माहिती देत सज्ञान करण्यासाठी निरंतर प्रयत्न केले जात आहेत. यात भर पडावी म्हणून राज्य शासनाने ग्रामीण भागातील जनतेचा आर्थिक विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) सुरू केले आहे.
या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील गरीब, वंचित, अनुसूचित जाती, जमाती, विधवा, अपंग, एकल महिला कुटुंबातील महिलांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. त्यासाठी महिलांचे स्वसहायत्ता गट तयार करण्यात येत असून, त्या गटांना शासनाकडून राेजगार निर्मितीसाठी अनुदान देणे, कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे, त्या कर्जाच्या व्याजावर अनुदान देणे, त्यातून महिलांसाठी राेजगार निर्मिती करून देणे यासह अन्य उपक्रम राबविले जातात.
उमेदच्या नरखेड शहरातील कार्यालयाची अवस्था फारच दयनीय आहे. या कार्यालयात ग्रामीण कौशल्य योजनेंतर्गत व्यावसायिक प्रशिक्षण देऊन प्रशिक्षणार्थीना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपनीत रोजगार उपलब्ध करून दिला जाताे. ग्रामीण स्वयंरोजगारांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन उद्योग उभारणीसाठी तयार करण्यात येते. यासाठी तालुका अभियान व्यवस्थापक बी. एन. कुमरे, तालुका व्यवस्थापक एस .बी. गतपणे, प्रभाग समन्वयक म्हणून एन. एम. गुडधे, पी. ए. गोसावी कार्यरत आहेत. या कार्यालयाची इमारत माेडकळीस आली असून, दारे व खिडक्या तुटलेल्या आहेत. बसायला आत व्यवस्थित फर्निचरचीही व्यवस्था करण्यात आली नाही. कार्यालय परिसरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कर्मचाऱ्यांना अत्यंत काेंदट व कुबट वातावरणात काम करावे लागते. त्यामुळे त्यांच्या आराेग्यावर परिणाम हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
...
महिलांसह पाल्यांनाही प्रशिक्षण
उमेद अभियानांतर्गत महिलांसह त्यांच्या पाल्यांनाही प्रशिक्षण दिले जाते. या अभियानांतर्गत तालुक्यात १,२२९ स्वयंसहायता गटांची स्थापना करण्यात आली आहे. यापैकी २१० गटांना ३ कोटी २० लाख रुपयांचे बँकेमार्फत कर्ज वाटप करण्यात आले आहे. ६० गटांना शासनाकडून ९० लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. २२० गटांनी कर्ज मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. एवढ्या चांगल्या प्रमाणात ग्रामीणांची जीवनोन्नती करणाऱ्या कार्यालयाची अवस्था दयनीय आहे.
...
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व्यवस्थापन कक्षाकरिता कार्यालयाचे बांधकाम करण्यात यावे. यासाठी तीन लाख रुपयांचा बांधकाम आराखडा शासनाला सादर केला आहे. त्याला मंजुरी मिळून नवीन इमारतीचे बांधकाम हाेईपर्यंत याच कार्यालयातून कारभार चालवावा लागणार आहे. पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कार्यालयीन कामकाज खंड पडणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
- बी. एन. कुमरे, व्यवस्थापक,
तालुका अभियान (उमेद), नरखेड.