व्यवसायात मानवी संबंधांचे व्यवस्थापनही महत्त्वाचे, त्याचा अभ्यासक्रमात समावेश हवा- नितीन गडकरी

By मोरेश्वर मानापुरे | Published: March 2, 2024 09:46 PM2024-03-02T21:46:13+5:302024-03-02T21:47:13+5:30

सेंट्रल इंडिया मॅनेजमेंट कॉन्क्लेव्हचे उद्घाटन

Management of human relations is also important in business, it should be included in the curriculum - Nitin Gadkari | व्यवसायात मानवी संबंधांचे व्यवस्थापनही महत्त्वाचे, त्याचा अभ्यासक्रमात समावेश हवा- नितीन गडकरी

व्यवसायात मानवी संबंधांचे व्यवस्थापनही महत्त्वाचे, त्याचा अभ्यासक्रमात समावेश हवा- नितीन गडकरी

मोरेश्वर मानापुरे, नागपूर : व्यवसायामध्ये मानवी संबंधांनादेखील खूप महत्त्व आहे. आपण सहकाऱ्यासोबत कसे वागतो, कसे बोलतो, आपले नेतृत्व कसे आहे, यावर व्यवसायाचे यश अवलंबून असते. त्यामुळे ‘मानवी संबंधांचे व्यवस्थापन’ कसे करायचे याचाही अभ्यासक्रमात समावेश असायला हवा, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केली.

आयआयएम आणि विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशनच्यावतीने आयआयएम, मिहानमध्ये आयोजित दोन दिवसीय सेंट्रल इंडिया मॅनेजमेंट कॉन्क्लेव्ह ‘सिमकॉन-२०२४’चे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी आयआयएम नागपूर संचालक डॉ. भीमराया मैत्री, मुख्य प्रायोजक व आर.सी. प्लास्टोचे संचालक विशाल अग्रवाल, सेंट्रल स्टार मोटर्सचे के.एस चीमा, व्हीएमएचे अध्यक्ष सौरभ मोहता, व्हीएमएचे श्रीकांत संपत, सिम्कॉनचे सदस्य ब्रिज सारडा आणि आयआयएम नागपूरचे वरिष्ठ प्राध्यापक आलोक कुमार उपस्थित होते.

नितीन गडकरी म्हणाले, व्यवसाय व व्यवस्थापनासाठी उत्तम तंत्रज्ञान पुरेसे नाही. त्या जोरावर यश मिळेल, पण ते तात्कालिक असेल. दीर्घकाळ यशस्वी राहायचे असेल तर मूल्य अधिक महत्त्वाची आहेत. टीमवर्क, वागणूक, विश्वासार्हता, सकारात्मकता आणि आत्मविश्वास याला खूप महत्त्व आहे. काही लोक संकटात संधी शोधतात तर काही संधीमध्ये समस्या निर्माण करतात. बरेचदा अहंकार आणि वागणुकीमुळे संपूर्ण चित्र बदललेले आपण बघतो. त्यामुळे मानवी संबंधांनाही तेवढेच महत्त्व आहे. नेतृत्व करणाऱ्यामध्ये योग्य दृष्टीकोन असणे आवश्यक आहे. गुणवत्ता, मूल्य, पारदर्शकता कायम ठेवून उत्पादन शुल्क कमी करण्याचा विचार केला पाहिजे.

नेतृत्व, प्रामाणिकपणा, विश्वासार्हता आणि मूल्य ही चतु:सूत्रीदेखील व्यवस्थापनाचाच भाग आहे. या चतु:सूत्रीच्या आधारावरच उत्तम व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपल्या प्रदेशातील क्षमता ओळखून त्यांचे संधीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. प्रास्तविकेत डॉ. भीमराया मैत्री यांनी एमएसएमई क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा परिषदेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. प्रमुख वक्ते संदीप सिंग यांनी लिहिलेले ‘टेम्पल एकॉनॉमी’ हे पुस्तक गडकरी यांना भेट देण्यात आले. संचालन आयोजन समितीचे अध्यक्ष ब्रिज सारडा यांनी केले.

Web Title: Management of human relations is also important in business, it should be included in the curriculum - Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.