मनपाचा दावा फोल-फोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 01:23 AM2017-08-28T01:23:00+5:302017-08-28T01:23:35+5:30
पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर गेल्या महिनाभरात उपराजधानीतील डांबरी रस्ते उखडून त्यावर खड्डे पडलेले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर गेल्या महिनाभरात उपराजधानीतील डांबरी रस्ते उखडून त्यावर खड्डे पडलेले आहेत. लोकांच्या तक्रारी आल्यानंतर गणेशोत्सवापूर्वी खड्डे दुरुस्त करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले होते. एवढेच नव्हे तर रोज खड्डे बुजविल्याचा प्रशासनाचा दावा आहे. त्यानंतरही शहरातील रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याने हा दावा फोल ठरला आहे. त्यामुळे प्रशासनाचीच पोलखोल झाली आहे.
दरवर्षी पावसाळ्याला सुरुवात होताच शहरातील रस्ते उखडतात. खड्ड्यांमुळे अपघात होतात. वाहनचालकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याचे काम केल्यानंतर दोन वर्षांचा दायित्व कालावधी असतो. त्यानुसार गेल्या तीन वर्षांत महापालिकेने जवळपास ४०० रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. शहरातील रस्ते महापालिका, नासुप्र, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ आदींच्या मालकीचे आहेत.
परंतु २२७१ किलोमीटरपैकी २१७२ किलोमीटर लांबीचे रस्ते महापालिकेच्या मालकीचे असल्याने, शहरातील रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी प्रामुख्याने महापालिकेचीच आहे.
रस्त्यांवर फलक लागलेच नाही
उखडलेल्या रस्त्यामुळे महापालिकेची बदनामी होत असल्याने शहरातील सर्व रस्त्यांवर फलक लावण्याची घोषणा वर्षभरापूर्वी करण्यात आली होती. त्यानुसार यात रस्ता कोणाच्या मालकीचा आहे, रस्त्याचे काम कोणत्या कंत्राटदाराने केले़, त्याला केव्हा काम दिले, दायित्व कालावधी केव्हापर्यंत आहे, कामाची किंमत, कामावर देखरेख ठेवणाºया महापालिकेतील अधिकाºयाचे नाव आदी बाबींचा यात समावेश राहणार होता. परंतु प्रत्यक्षात असे फलक लागलेच नाही.
बुजविल्यानंतर पुन्हा खड्डे
शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. एप्रिल २०१४ जून २०१७ या कालावधीत खड्डे बुजविण्यासाठी ५३ कोटींची तरतूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात २१ कोटी ६० लाखांचाच खर्च करण्यात आला. जेट पॅचरच्या माध्यमातून खड्डे बुजविण्यावर १४ कोटी ४५ लाखांचा खर्च करण्यात आला तर हॉटमिक्स प्लान्टवर ७ कोटी १५ लाखांचा खर्च करण्यात आला. परंतु खड्डे बुजविलेल्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडलेले आहेत.