मणप्पुरम गोल्ड दरोड्यातील आरोपींना आंध्रप्रदेशातून अटक
By admin | Published: February 10, 2017 02:48 AM2017-02-10T02:48:02+5:302017-02-10T02:48:02+5:30
नारा रोड जरीपटका येथील मणप्पुरम गोल्ड कार्यालयात दरोडा टाकून ३१ किलो सोन्याचे दागिने व ३ लाख रुपये
सुबोध सिंह टोळीतील दोघे गजाआड
नागपूर : नारा रोड जरीपटका येथील मणप्पुरम गोल्ड कार्यालयात दरोडा टाकून ३१ किलो सोन्याचे दागिने व ३ लाख रुपये लुटून नेणाऱ्या सुबोध सिंह टोळीतील दोन सदस्यांना विशाखापट्टणम येथे शस्त्रासह अटक करण्यात आली.
विशाखापट्टणम आणि पश्चिम बंगाल पोलिसांनी संयुक्तपणे ही चालविलेल्या एका आॅपरेशनमध्ये अनुराग कुमार सिंह ऊर्फ जॅकी आणि सन्नी कुमार सिंह याला पकडले. त्यांच्याजवळून विदेशी पिस्तुल आणि देशी कट्टासुद्धा जप्त करण्यात आला. या अटकेमुळे मणप्पुरम गोल्ड येथील दरोड्याचाही खुलासाही होण्याची शक्यता बळावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अनुराग कुमार सिंह ऊर्फ जॅकी व सन्नी कुमर हे दोघेही सुबोध सिंह याच्याशी जुळलेले आहेत. ते २९ जानेवारी रोजी विशाखापट्टणम येथे पोहोचले. त्यांनी दुचाकी मिळविली. यानंतर ते दरोड्याची योजना आखू लागले. मुत्थुट फायनान्स, मणप्पुरम फायनान्स, बँक आणि सराफा शोरूम लुटण्याची त्यांची योजना होती. योजनेंतर्गत त्यांनी आपल्या टोळीतील इतर सदस्यांना विशाखापट्टणमला बोलावले होते. अंतिम योजना तयार झाल्यानंतर दरोडा टाकण्यात येणार होता. सुबोध सिंहने पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये दरोडा टाकला आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल पोलीस त्यांच्या मागावर होते. ते सुद्धा विशाखापट्टणमला पोहोचले. स्थानिक पोलिसांसोबत योजना तयार करून त्यांनी दोघांना पकडले.(प्रतिनिधी)
गुन्हे शाखेचे अपयश
सुबोध सिंहला पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस अनेकदा बिहारला जाऊन आले. बिहारमध्ये तैनात असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांची मदत सुद्धा घेतली. परंतु जान्हवीला सोडून कुणीही त्यांच्या हाती लागले नाही. सुबोध सिंह आपल्या साथीदारांसह नेपाळमध्ये लपून असल्याचे त्यांना संशय होता. परंतु विशाखापट्टणम पोलिसांच्या कारवाईनंतर सुबोध देशातच सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे.