मनपाकडे हॉकर्सचे ४९ लाख रुपये जमा
By admin | Published: February 25, 2016 03:15 AM2016-02-25T03:15:20+5:302016-02-25T03:15:20+5:30
शहरातील परवानाधारक हॉकर्सनी व्यवसाय करण्यासाठी मनपाकडे प्रत्येकी ११०० रुपये जमा केले आहेत. असे सुमारे ४९ लाख रुपये मनपाकडे जमा आहेत, ...
हायकोर्टात माहिती : हॉकर्स असोसिएशनचे प्रतिज्ञापत्र
नागपूर : शहरातील परवानाधारक हॉकर्सनी व्यवसाय करण्यासाठी मनपाकडे प्रत्येकी ११०० रुपये जमा केले आहेत. असे सुमारे ४९ लाख रुपये मनपाकडे जमा आहेत, अशी माहिती सीताबर्डी हॉकर्स वेल्फेअर असोसिएशनने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.
मनपाने हॉकर्सचे अतिक्रमण हटविले नाही म्हणून सीताबर्डी मर्चन्टस् असोसिएशनचे सचिव व्ही. एम. अग्रवाल यांनी उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली आहे. याप्रकरणात हॉकर्स असोसिएशनने प्रतिज्ञापत्र सादर करून वरील माहिती दिली. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेने हॉकर्सच्या समस्या सोडविण्यासाठी समिती स्थापन केली आहे. समितीच्या काही सभा झाल्या आहेत. परंतु, त्यात कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १० जून २००२ रोजी दिलेल्या आदेशानुसार शहरात हॉकर्स झोन तयार करणे आवश्यक आहे. या आदेशाचीही अंमलबजावणी करण्यात आली नाही.
याउलट मनपा हॉकर्सवर गैरकायदेशीररीत्या कारवाई करीत आहे. शहरात सध्या नेताजी मार्केट, पटवर्धन मैदान, महाराजबाग रोड, पीकेव्ही मैदान ते झाशी राणी चौक येथे जागा उपलब्ध आहेत. ओटे, पार्किंग, पिण्याचे पाणी व विजेची सुविधा उपलब्ध करून दिल्यास परवानाधारक हॉकर्स येथे व्यवसाय करण्यास तयार आहेत. सर्व हॉकर्स कायद्यानुसार व्यवसाय करीत आहेत. पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत हॉकर्सना मुख्य रोडवरच व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी. केवळ परवाना नसलेल्या हॉकर्सवर कारवाई करण्यात यावी, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात संघटनेने २१ जानेवारी रोजी मनपाच्या बाजार विभागाचे सहायक आयुक्तांना पत्र लिहिले, असेही न्यायालयाला सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)