मेट्रो रेल्वेतून प्रवासासाठी लसीच्या दोन डोसची सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:10 AM2021-08-15T04:10:14+5:302021-08-15T04:10:14+5:30
नागपूर : पूर्वी लसीचे डोस न घेतलेल्यांनाही नागपूर मेट्रोतून प्रवास करता येत होता. पण राज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार मुंबईप्रमाणे ...
नागपूर : पूर्वी लसीचे डोस न घेतलेल्यांनाही नागपूर मेट्रोतून प्रवास करता येत होता. पण राज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार मुंबईप्रमाणे नागपुरातही १५ ऑगस्टपासून मेट्रो रेल्वेतून प्रवाशांसाठी लसीच्या दोन डोसची सक्ती करण्यात आली आहे. याशिवाय प्रवाशाला दुसरी लस घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण होणे आवश्यक आहे. शिवाय लसीकरणाचे प्रमाणपत्रही सोबत ठेवावे लागेल. त्यामुळे आधीच कमी प्रवासीसंख्या असलेल्या मेट्रोत प्रवाशांची कमतरता भासणार आहे.
गेल्या वर्षी १५ ऑगस्टला नागपूर मेट्रो रेल्वेतून जवळपास ३० हजार नागरिकांनी प्रवास केल्याची नोंद आहे. यंदाही १५ ऑगस्टला मेट्रो रेल्वेतून प्रवास करण्याचे अनेकांनी नियोजन केले आहे. पण राज्य सरकारच्या आदेशामुळे त्यांच्या नियोजनावर विरजण पडले आहे. दोन्ही डोसचे प्रमाणपत्र कर्मचाऱ्यांना दाखविण्याशिवाय प्रवाशांना स्टेशनवर प्रवेशच मिळणार नाही. राज्य सरकारची ही सक्ती प्रवाशात निरुत्साह आणणारी आहे.
कोरोना काळात मुंबईत शासकीय आणि आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मुंबई लोकल आणि मेट्रोतून प्रवासाची मान्यता होती. पण नागपुरात मेट्रोमध्ये लस न घेतलेलेही प्रवास करायचे. आता राज्य सरकारच्या आदेशानुसार मुंबईतही लोकल आणि मेट्रोत दोन डोस आणि १४ दिवस पूर्ण केलेल्यांना प्रवास करता येणार आहे. हाच नियम नागपूर मेट्रो रेल्वेसाठी लागू करण्यात आला आहे. या आदेशामुळे मेट्रो रेल्वेच्या प्रवासी संख्येत निश्चितच घट होणार असल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मेट्रोने काही दिवसापूर्वीच ऑरेंज आणि अॅक्वा या दोन्ही मार्गावर दर १५ मिनिटांनी मेट्रो रेल्वेची प्रवासी सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ झाली होती. नवीन आदेश आरोग्य आणि अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, अधिकारी आणि नागरिकांसाठी लागू राहणार आहे.