‘मंगल भवन अमंगल हारी’... पुन्हा गुंजले तेच मधूर स्वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 04:03 PM2020-03-28T16:03:05+5:302020-03-28T16:07:39+5:30
‘रामायण’चा पहिला ऐपिसोड सादर झाला आणि अनेक वस्त्या सुनसान झाल्या होत्या. जे सरकारच्या आवाहनाला जमले नाही, ते या मालिकेच्या पहिल्या भागाने करून दाखवले, हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऐंशी-नव्वदच्या काळात अघोषित संचारबंदी करणाऱ्या दूरचित्रवाहिनीवरील ज्या मालिकांचे नावे घेतले जाते, त्यात रामायण व महाभारत या दोन पौराणिक गाथांचा क्रम पहिला लागतो. या दोन्ही मालिकांची जादू अशी काही होती की लोक टीव्हीलाच हार घालक, दिव्यांची ओवाळणी घालत असत. या मालिकांची लोकप्रियता बघता आणि वर्तमानातील लॉकडाऊनचा काळ बघता दूरदर्शनने या दोन्ही मालिकांचे पुन: प्रसारण करण्याचा निर्णय घेतला आणि ऐंशी-नव्वदच्या दशकातील तिच जादू पुन्हा अनुभवता आली. ‘रामायण’चा पहिला ऐपिसोड सादर झाला आणि अनेक वस्त्या सुनसान झाल्या होत्या. जे सरकारच्या आवाहनाला जमले नाही, ते या मालिकेच्या पहिल्या भागाने करून दाखवले, हे विशेष.
पंतप्रधानांनी २१ दिवसाचा लॉकडाऊन पुकारल्यानंतर वर्दळीत राहायची सवय असलेल्या भारतीयांना एकांतवास सहन होणार नाही, याची जाणिव होतीच. केबलवर सिनेमे बघून बघून किती बघणार आणि घरातील वेळ कसा घालविणार, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला. त्याला उत्तर म्हणून दूरदर्शनने रामायण, व्योमकेश बक्षी, महाभारत, देख भाई देख अशा प्रचंड गाजलेल्या आणि आजही तिच क्रेझ असलेल्या मालिकांचे पुन: प्रसारण करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने २८ मार्च रोजी रामायण व व्योमकेश बक्षी या मालिकांचे प्रसारण झाले आणि नागरिकांनी या मालिकांचा रसास्वाद घेतला. विशेष म्हणजे रामायण व महाभारत नागरिकांच्या विशेष आकर्षणाचे केंद्र कायम राहिले आहे. त्यामुळे रामायणाच्या प्रसारणाच्या वेळी शहरात अघोषित संचारबंदी दिसून आली. दुपारी १२ वाजता ‘महाभारत’चे प्रसारण होईल, या आशेने अनेकांनी टीव्ही सोडला नव्हता. मात्र, ती अपेक्षा फोल ठरल्याने अनेक नागरिक नाराज झाले.
केबल, सेटटॉप बॉक्सवाल्यांची दुकानदारी
: कोनोराच्या संक्रमणापासून समाजाला वाचविण्यासाठी सरकारकडून बरेच प्रयत्न केले जात आहेत. रामायण, महाभारतचे पुन: प्रसारण हा त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे. मात्र, अशावेळी केबल आॅपरेटर्स व वेगवेगळ्या कंपन्यांचे सेटटॉप बॉक्सवाल्यांनी यावरही दुकानदारी सुरू केल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांनी केल्या. केबल वाहिनी व सेटटॉप बॉक्समधून दुरदर्शन गायब झाल्याचे दिसून येत होते.
दूरदर्शन नि:शुल्क वाहिनी
: विशेष म्हणजे नव्या मापदंडानुसार सरकारकडून शंभर वाहिन्या नि:शुल्क प्रदान केल्या जात आहेत. त्यात दूरदर्शन व संलग्नित बºयाच वाहिन्या आहेत. त्यामुळे, हे चॅनल दाखविणे आवश्यक आहे. मात्र, रामायण व महाभारत मुळे इतर वाहिन्या कुणी बघणार नाही, या हेतूने खाजगी केबलचालकांनी व सेटटॉप बॉक्सवाल्यांनी दुरदर्शन गायब केल्याचे स्पष्ट होत आहे. अशांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
...........