१६ वर्षांपासून मंगलदीपनगरवासी नळाच्या प्रतीक्षेत ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:10 AM2021-02-21T04:10:08+5:302021-02-21T04:10:08+5:30
नागपूर : शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्या शहरात सुरू होत आहेत. मेट्रो रेल्वे, आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय नागरिकांसाठी ...
नागपूर : शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्या शहरात सुरू होत आहेत. मेट्रो रेल्वे, आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय नागरिकांसाठी खुले झाले आहे. परंतु दक्षिण नागपुरातील मंगलदीपनगरातील नागरिकांना मात्र रस्ते, गडरलाईन, नळलाईनसाठी अद्यापही वाट पाहावी लागत आहे. मंगलदीपनगरातील नागरिक मागील १६ वर्षांपासून नळलाईनची मागणी करीत आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून महानगरपालिकेने या भागात त्वरित सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
टँकरच्या पाण्यावर राहावे लागते अवलंबून
मंगलदीपनगरातील नागरिक मागील १६ वर्षांपासून नळलाईनची मागणी करीत आहेत. परंतु अद्यापही त्यांच्या मागणीकडे परिसरातील नगरसेवक, महापालिकेने लक्ष पुरविले नाही. या भागात नळलाईन नसल्यामुळे नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करण्याची पाळी येते. त्यामुळे महापालिकेने या भागातील नागरिकांना नळलाईन उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक करीत आहेत. बाजूच्या वस्तीतून आलेली गडरलाईनही उघडीच ठेवल्यामुळे या गडरलाईनच्या दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
नाल्याची दुर्गंधी, रिकाम्या प्लॉटमध्ये साचते पाणी
परिसरातून गेलेल्या नाल्याची अवस्था अतिशय वाईट आहे. दक्षिण नागपुरातील नागरिक याच नाल्यात आपल्या घरातील कचरा टाकतात. नाल्याच्या सफाईसाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे या नाल्याच्या दुर्गंधीचा सामना मंगलदीपनगरातील नागरिकांना करावा लागत आहे. नाल्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना घरात राहणेही कठीण होते. याबाबत अनेकदा निवेदन देऊनही काहीच उपाययोजना करण्यात आली नसल्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या नाल्यावर सुरक्षा भिंत टाकण्याची नागरिकांची मागणी आहे. तसेच गुंतवणूक म्हणून अनेक नागरिकांनी या भागात प्लॉट घेऊन ठेवले आहेत. या प्लॉटवर झाडेझुडपे वाढली आहेत. पावसाळ्यात या प्लॉटमध्ये पाणी साचते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होतो. नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे. त्यामुळे रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे.
अंतर्गत रस्त्याची अवस्था बिकट
मंगलदीपनगरातील रस्ते अतिशय खराब झालेले आहेत. रस्त्यावरील गिट्टी उखडलेली असल्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचत असल्यामुळे वाहनचालकांना खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे त्यांचा अपघात होतो. त्यामुळे महानगरपालिकेने या भागात डांबरीकरण करण्याची मागणी नागरिक मागील अनेक दिवसांपासून करीत आहेत.
नळलाईनची व्यवस्था करावी
‘मागील १६ वर्षांपासून नळलाईन नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे नागरिकांची समस्या महापालिकेने दूर करावी.’
-ऋषी मोहाडीकर, नागरिक
गडरलाईनची दुर्गंधी दूर करावी
‘बाजूच्या वस्तीतून आलेली गडरलाईन उघडीच सोडण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना गडरलाईनच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ही गडरलाईन मुख्य गडरलाईनला जोडून येत असलेली दुर्गंधी बंद करावी.’
-संजय मेश्राम, नागरिक
रस्त्याचे डांबरीकरण करावे
‘रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास होतो. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्यामुळे वाहन चालविणे कठीण होते. त्यामुळे या भागात डांबरीकरण करण्याची गरज आहे.’
-कुणाल पोकळे, नागरिक
नाल्यात कचरा टाकणे बंद करावे
‘अनेक नागरिक नाल्यात कचरा आणून टाकतात. नाल्याची नियमित सफाई करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांना नाल्याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. नाल्यात कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे.’
-सुमन गायकवाड, महिला
रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई व्हावी
‘अनेक नागरिकांनी मंगलदीपनगरात प्लॉट घेऊन ठेवले आहेत. या प्लॉटमध्ये झाडे वाढली आहेत. पावसाळ्यात या प्लॉटमध्ये पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करण्यात यावी.’
-दीपाली जैन, महिला
गडरलाईनची व्यवस्था करावी
‘मागील अनेक वर्षांपासून मंगलदीपनगरात गडरलाईन नाही. गडरलाईनच्या मागणीसाठी अनेकदा महापालिकेकडे मागणी करण्यात आली. परंतु अद्यापही काहीच कारवाई न झाल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.’
-मीना सोनकुसरे, महिला
...............