परिषदेत मंगलप्रभात लोढांनी खिशातून राजीनामाच बाहेर काढला; विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या आरोपींमुळे व्यथित 

By योगेश पांडे | Published: December 20, 2023 06:26 PM2023-12-20T18:26:36+5:302023-12-20T18:27:23+5:30

हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस विधानपरिषदेसाठी नाट्यमय ठरला.

Mangalprabhat Lodha took out his resignation from his pocket in the conference Disturbed by accusations made by opposition leaders | परिषदेत मंगलप्रभात लोढांनी खिशातून राजीनामाच बाहेर काढला; विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या आरोपींमुळे व्यथित 

परिषदेत मंगलप्रभात लोढांनी खिशातून राजीनामाच बाहेर काढला; विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या आरोपींमुळे व्यथित 

नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस विधानपरिषदेसाठी नाट्यमय ठरला. अगोदर सुषमा अंधारे यांच्यावर सभागृह संतप्त झाले असताना विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपांमुळे व्यथित झालेल्या कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सभागृहातच खिशातून कागद बाहेर काढत राजिनामा देऊन पद सोडण्याची तयारी दाखवली. मागील तीन दशकांपासून सभागृहात असून मी कुठलाही गैरप्रकार केलेला नाही. माझ्यावर किंवा कुटुंबियांवर अनियमिततेचे आरोप करणाऱ्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुरावे सादर करण्याचे आव्हानच त्यांनी केले.

अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान दानवे यांनी लोढा यांच्यावर आरोप केले. मंत्री लोढा यांच्याबाबत अनेक तक्रारी आहेत. कुणाच्याही जमिनी घ्यायच्या. मुंबईत जमिनी, ठाणे, कल्याण, भिवंडीत जमिनी घेतल्या, असं अंबादास दानवे म्हणाले. यानंतर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतल्यावर लोढा यांचे नाव आपण मागे घेत असल्याचं दानवे म्हणाले. पण त्यानंतर लोढा यांचे नाव न घेता, दानवे यांनी त्यांचा मुंबईचे पालकमंत्री असा उल्लेख करत, आरोपांच्या फैरी चालूच ठेवल्या. काही वेळाने लोढा सभागृहात आले व त्यांनी अनपेक्षितच कृत्य केले. मागील १० वर्षांपासून मी कुटुंबाच्या व्यवसायात सक्रिय नाही. माझ्या कुटुंबाकडून सर्व नियमे पाळून व्यवसाय करण्यात येतो. कुठलेही बेकायदेशीर काम केले असेल तर माझी राजिनामा देण्याची तयारी आहे, असे म्हणत त्यांनी खिशातून कागद काढला. मी या कोऱ्या कागदावर सही करत राजिमाना देतो असेच ते म्हणाले. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मी ३० वर्षांपासून सभागृहात आहे. दानवे पुराव्यांशिवाय वाट्टेल ते आरोप करत आहेत. मी मंत्रीपदाचा कुठलाही दुरुपयोग केलेला नाही. त्यांनी पुरावे सादर करावे, असे आव्हान लोढा यांनी दिले. यावर दानवे यांनी पुरावे देण्याची तयारी दाखवली. अखेर उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मध्यस्थी केली. अनेकजण राजिनामा खिशात ठेवतात. मात्र लोढा यांनी राजिनामा देण्याची तयारी दाखवली. दानवे यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी लोकपाल, पोलीस यांच्याकडे तक्रार करावी, असे त्या म्हणाल्या.

नोटीस का नाही?
या प्रकारावरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. सभागृहात कुणाचे नाव घ्यायचे असेल तर नोटीस देण्याचा नियम आहे. नियमांची स्पष्टता असतानाही वारंवार अस का घडतेय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला

Web Title: Mangalprabhat Lodha took out his resignation from his pocket in the conference Disturbed by accusations made by opposition leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.