मंगळवारी बाजार हत्याकांड : केवळ पाच हजारासाठी खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:36 PM2019-07-24T23:36:36+5:302019-07-24T23:38:06+5:30
केवळ पाच हजार रुपयासाठी सदर येथील मंगळवारी बाजारात गुन्हेगारांनी भाजी विक्रेत्याच्या कर्मचाऱ्याचा खून केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केवळ पाच हजार रुपयासाठी सदर येथील मंगळवारी बाजारात गुन्हेगारांनी भाजी विक्रेत्याच्या कर्मचाऱ्याचा खून केला. सदर पोलिसांनी आरोपी खुशाल प्रभाकर राजुरकर (२६) आणि अक्षय कमलेश फुसाटे (२५) रा. रामबाग याला अटक केली. खुशालचा भाऊ सूर्यकांत राजुरकर, साथीदार अक्षय रामटेके आणि एक अल्पवयीन फरार आहे.
सुभाष मोहल्ले (२६) हा भाजी दलाल किशोर कांबळे यांच्याकडे काम करीत होता. पैशाच्या वसुलीसाठी त्याचे मंगळवारी बाजारात येणे-जाणे होते. खुनाचा सूत्रधार खुशाल राजुरकर याच्यासोबत त्याची ओळख होती. खुशाल आणि खुनात सहभागी त्याच्या भावासह सर्व आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. सुभाषने खुशालला २० हजार रुपये उधार दिले होते. त्याच्या बदल्यात खुशालची बाईक गहाण ठेवली होती. खुशालने दीड महिन्यापूर्वी पैसे परत करून बाईक सोडवून घेतली. यानंतरही सुभाष त्याला पाच हजार रुपये मागत होता. यामुळे दोघांमध्ये वाद सुरू होता. खुशाल आणि त्याचे साथीदार गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, याची सुभाषला जाणीव होती. यानंतरही तो त्यांच्याशी वाद घालायचा. मंगळवारी दुपारी पैस मागण्यावरून पुन्हा त्यांचा वाद झाला. खुशालचे म्हणणे आहे की, सुभाषने त्याला शिवीगाळ करीत मंगळवारी बाजारात येण्याचे आव्हान दिले होते. यामुळे त्याला प्रचंड राग आला. तो आपला भाऊ आणि साथीदारासह मंगळवारी बाजारात गेला आणि सुभाषवर हल्ला केला. त्याचा खून करून फरार झाला. पोलिसांनी मंगळवारी रात्रीच खुशाल आणि त्याचा साथीदार अक्षयला अटक केली.
खुशालचे म्हणणे आहे की, त्याने सुभाषकडून घेतलेले २० हजार रुपये परत केले होते. यानंतरही सुभाष त्याला पाच हजार रुपये मागत होता. त्यासाठी त्याला वारंवार अपमानित करायचा. त्याला शिवीगाळ करून धमकवायचा. त्यामुळे त्याचा खून केला.
सुभाष गरीब कुटुंबातील होता. त्याच्या कुटुंबात पत्नी, आई आणि दोन वर्षाची मुलगी आहे. त्याच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले. यामुळे तो लहानपणापासूनच किशोर कांबळे यांच्याकडे काम करीत होता. कांबळेने त्याला मुलासारखे ठेवले होते. सुभाषच्या मृत्यूमुळे त्याचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. वयोवृद्ध आई, विधवा पत्नी आणि मुलीच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर पोलिसांनी खुशाल व अक्षयला न्यायालयासमोर सादर करून १ ऑगस्टपर्यंत ताब्यात घेतले आहे.