रेल्वेतील गर्दीची संधी साधून हवालाच्या कोट्यवधींच्या रकमेची हेरफेर

By नरेश डोंगरे | Published: November 3, 2024 11:13 PM2024-11-03T23:13:20+5:302024-11-03T23:13:38+5:30

मुखबिरांचे नेटवर्क कमकुवत : ठिकठिकाणी पोहचत आहे मोठी खेप

Manipulation of crores of hawala amount by taking advantage of railway congestion | रेल्वेतील गर्दीची संधी साधून हवालाच्या कोट्यवधींच्या रकमेची हेरफेर

रेल्वेतील गर्दीची संधी साधून हवालाच्या कोट्यवधींच्या रकमेची हेरफेर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रेल्वेतील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत हवालावाल्यांकडून कोट्यवधींच्या रकमेची हेरफेर केल्या जात असल्याची विश्वसनीय सूत्रांची आहे. विशेष म्हणजे, रेल्वेस्थानक तसेच परिसरात कर्तव्य बजावणारे या संबंधाने अनभिज्ञ असल्याने आणि पोलिसांचे मुखबिरांचे नेटवर्क कमकुवत झाल्याने हवालावाले बिनबोभाट आपला खेळ करीत आहेत.

मध्य भारतातील सर्वात मोठे हवालाचे केंद्र नागपुरात आहे. येथील नेटवर्कच्या माध्यमातून रोज देशाच्या कानाकोपऱ्यात हवालाची रोकड आणली आणि पोहचवली जाते. तपास यंत्रणातील अनेक जुन्या खेळाडूंना त्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वीपर्यंत नागपुरातील हवाला व्यवसायाचा वेळोवेळी भंडाफोड होत होता. हवालावाल्यांनी पद्धतशिर काही जणांना 'सेट' करून आपले अडथळे बाजुला सारले आहे. ज्यांना या व्यवसायाची माहिती आहे, ते अर्थपूर्ण चुप्पी साधून आहेत. त्यामुळे नागपुरात रोज कोट्यवधींची रोकड येते आणि येथून ती नियोजित ठिकाणी पोहचवली जाते. हवालाची रक्कम आणण्या-पाठवण्यासाठी संबंधितांकडून वेगवेगळ्या वाहनांचा वापर केला जातो. त्यासाठी चारचाकीच नव्हे तर दुचाकी वाहनांनाही विशेष कप्पे तयार करून घेतले जातात. चुकून एखादवेळी पोलिसांच्या तपासणीत हे वाहन आले तरी वरवर तपासणी केली जात असल्याने त्यात काही आढळत नाही. अशा प्रकारे ती रोकड घेऊन वाहनचालक नियोजित ठिकाणी पोहचतो आणि ठरलेल्या व्यक्तीला ती खेप देतो.

२२ ऑक्टोबरपासून महाराष्ट्र, झारखंडमध्ये विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यापासून विविध मार्गावर ठिकठिकाणी नाकेबंदी केली जात आहे. ईलेक्शन कमिनशनकडून तयार करण्यात आलेली पथके, पोलीस पथके संशय आलेल्या वाहनांची कसून तपासणी करतात. ठिकठिकाणी कोट्यवधी रुपये पकडलेही गेले आहेत. त्यामुळे हवालावाल्यांना धोका निर्माण झाला आहे. ते लक्षात घेऊन त्यांनी हवालाची खेप रेल्वे गाड्यांमधून पाठविणे सुरू केल्याची सूत्रांची माहिती आहे.

स्फोटकांवर नजर, रोकड दुर्लक्षित !
निवडणूकीदरम्यान ब्लॅक मनी मोठ्या प्रमाणात बाहेर येतो. सध्या महाराष्ट्रात विधानसभेची धामधुम सुरू आहे. अशात रेल्वेस्थानकं आणि गाड्यांमध्येही प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे हवालाची खेप पोहचविणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. रेल्वेच्या तपास यंत्रणा स्फोटके किंवा संशयास्पद व्यक्तींवर नजर केंद्रीत करून आहेत. त्यामुळे रोकड घेऊन निघालेले दुर्लक्षित झालेले आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षांपासून खेप ईकडून तिकडे करणारे हवालावाले 'कुरियर' बिनबोभाटपणे कोट्यवधींची रोकड नियोजित ठिकाणी पोहचवत असल्याचे सांगितले जाते.

पार्सल स्कॅनरला होता जोरदार विरोध

रेल्वेतून जाणाऱ्या वेगवेगळ्या पार्सलमध्ये दडवून चार-सहा महिन्यांपर्यंत हवालाची मोठी रोकड ठिकठिकाणी पाठवली जात होती. 'लोकमत;ने त्याचा खुलासा केल्यानंतर विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी पार्सल विभागात स्कॅनर लावून प्रत्येकच पार्सल स्कॅन करणे बंधनकारक केले होते. त्याला अनेकांनी जोरदार विरोध केला होता. याच कालावधीत नागपूरहून जाणाऱ्या एका गाडीत ६० लाखांची रोकड पार्सल मधून पाठविण्यात आली होती आणि ती मुंबईत आरपीएफने पकडल्यानंतर एकच खळबळ निर्माण झाली होती. लोकमतचे वृत्तही त्यावेळी चर्चेला आले होते.

Web Title: Manipulation of crores of hawala amount by taking advantage of railway congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.