गोरेवाडा प्राणी उद्यानात येणार मणिपूरचे संगाई हरीण अन् बंगालचे लांडगे, कोल्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2022 02:12 PM2022-03-15T14:12:29+5:302022-03-15T14:13:08+5:30
नवी दिल्लीच्या नॅशनल झुलॉजिकल पार्कसोबत झालेल्या प्राणी हस्तांतरण प्रक्रियेनुसार १३ मार्चच्या रात्री मणिपुरातील दुर्मीळ संगाई हरीण, बंगालचे लांडगे आणि कोल्हे तसेच सांबर नागपुरात आले आहेत.
नागपूर : बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात १९ नवे पाहुणे दाखल होत आहेत. अर्थात त्यांच्या आगमनामुळे हे प्राणी उद्यान गजबजणार असून, पर्यटकांना त्यांचे आगमन सुखावणारे असणार आहे. हे पाहुणे अन्य कोणी नसून मणिपूरचे संगाई हरीण अन् बंगालचे लांडगे आणि कोल्हे आहेत.
नवी दिल्लीच्या नॅशनल झुलॉजिकल पार्कसोबत झालेल्या प्राणी हस्तांतरण प्रक्रियेनुसार १३ मार्चच्या रात्री मणिपुरातील दुर्मीळ संगाई हरीण, बंगालचे लांडगे आणि कोल्हे तसेच सांबर नागपुरात आले आहेत. गोरेवाडाचे संचालक एच. व्ही. माडभूषी यांच्या उपस्थितीत डॉ. उपाध्ये, डॉ. धूत यांच्या मार्गदर्शनात या प्राण्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार त्यांना क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे. ही मुदत संपताच या प्राण्यांना इंडियन सफारीच्या एनक्लोजरमध्ये सोडले जाईल.
सप्टेेंबर २०२१मध्ये गोरेवाडा प्राणी उद्यान आणि नॅशनल झुलॉजिकल पार्क, नवी दिल्ली यांच्यादरम्यान प्राणी हस्तांतरणाचा करार झाला होता. या प्रक्रियेनुसार २ ऑक्टोबर २०२१ रोजी गोरेवाडातून नॅशनल झुलॉजिकल पार्कसाठी २ वाघ आणि दोन अस्वले दिली होती, तर गोरेवाडाला त्यांच्याकडून संगाई हरीण, ब्लॅक बक आणि बार्किंग डिअर मिळाले होते.
...हे आहेत नवे पाहुणे
सांबर : ४
संगाई डिअर : ८
बंगाली लांडगे : ४
भारतीय कोल्हे : ३
मणिपूरच्या टापूतच आढळतात संगाई हरीण
मणिपूरच्या लोकटक तलावामध्ये असलेल्या वनस्पतींचे अवशेष आणि मातीपासून तयार झालेल्या टापूतच संगाई हरीण आढळतात. हा टापू पाण्याच्या प्रवाहासोबत तलावात तरंगतो. या दुर्मीळ हरिणांचे संवर्धन करण्यासाठी तलाव परिसरात किबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आली आहे. येथील संगाई हरिणांना विशेष संवर्धन प्रकल्पांतर्गत नॅशनल झुलॉजिकल पार्क, नवी दिल्ली येथे प्रजनन कार्यासाठी ठेवण्यात आले आहे. येथूनच देशातील विविध उद्यानांमध्ये त्यांना पाठविण्यात येते.