मणिपूरच्या विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठाचा आधार

By जितेंद्र ढवळे | Published: May 8, 2024 05:52 PM2024-05-08T17:52:19+5:302024-05-08T17:54:25+5:30

९ विद्यार्थ्यांनी घेतले शिक्षण : विद्यापीठ प्रशासनाचे मानले आभार

Manipur students taking education in Nagpur University | मणिपूरच्या विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठाचा आधार

Manipur students taking education in Nagpur University

नागपूर : खंडित झालेले शिक्षण पुन्हा सुरू ठेवण्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आशेचा किरण ठरले असल्याच्या भावना मणिपूरच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. शैक्षणिक अडचणी लक्षात घेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने वेळीच प्रवेश दिल्याने कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचा मणिपूर येथील विद्यार्थ्यांनी सत्कार करीत आभार मानले.

मणिपूर येथे हिंसाचार सुरू असल्याने अशांतता निर्माण झाली. अशा परिस्थितीत असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण झाले. अशा परिस्थितीचा सामना करीत मणिपूर येथील काही विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची प्रवेश मिळावा म्हणून संपर्क साधला. कुलगुरू डॉ. चौधरी यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक अडचण लक्षात घेता तातडीने मदत करीत या विद्यार्थ्यांचे प्रवेश विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये करवून घेतले. वेळीच मदत केल्याने अशांत असलेल्या मणिपूर येथील विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठात त्यांचे शिक्षण सुरू ठेवता आले.

मणिपूर येथील चुराचंदपूर तसेच कांग्पोक्पी येथील विद्यार्थ्यांचा नागपूर विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्यांमध्ये समावेश आहे. पाच विद्यार्थी व ४ विद्यार्थिनींना विद्यापीठाने विविध ठिकाणी प्रवेश दिला आहे. विद्यापीठाचा पदव्युत्तर गणित विभाग, पदव्युत्तर इंग्रजी विभाग, पदव्युत्तर मानसशास्त्र विभाग, पदव्युत्तर विधी विभाग आदी विविध विभागांमध्ये मणिपूर येथील एकूण ९ विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आलेली मदत त्याचप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील कुलगुरू कक्षात मणिपूरच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरू चौधरी यांचा सत्कार करीत आभार मानले. या वेळी मणिपूर येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

 

Web Title: Manipur students taking education in Nagpur University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.