शरद पवारांच्या निकटवर्तीयावर ईडीची कारवाई; R. L. समूहावर पडली धाड
By मोरेश्वर मानापुरे | Published: August 23, 2023 09:15 PM2023-08-23T21:15:33+5:302023-08-23T21:16:03+5:30
ईश्वरलाल जैन चौकशीसाठी गैरहजर
नागपूर : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) नागपूर कार्यालयाने आर. एल. समूहाचे प्रमुख माजी खासदार ईश्वरलाल जैन यांचा मुलगा मनीष जैन आणि सून नितिका जैन यांची सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी १०:१५ वाजल्यापासून सायंकाळपर्यंत कसून चौकशी केली. ईडीने ईश्वरलाल जैन यांनाही नागपूर कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावली होती, पण तब्येतीच्या कारणांनी ते बुधवारी गैरहजर होते. मनीष जैन आणि नितिका जैन यांचे वकील कार्यालय परिसरात हजर होते.
ईडीच्या नागपूर कार्यालयाने बजावलेल्या नोटीसनुसार मनीष जैन आणि नितिका जैन मंगळवारी दुपारी ३ वाजता सेमीनरी हिल्स येथील सीजीओ कॉम्प्लेक्सच्या सातव्या माळ्यावरील कार्यालयात वकिलांसह हजर झाले होते. या दोघांची उपसंचालक पदाच्या अधिकाऱ्यांकडून रात्री ११ वाजेपर्यंत चौकशी सुरू होती. त्यानंतर त्यांना बुधवारी सकाळी पुन्हा चौकशीसाठी बोलविले होते. त्यानुसार ते कार्यालयात हजर झाले होते. ईश्वरलाल जैन चौकशीसाठी कार्यालयात केव्हा हजर होणार, हे कळू शकले नाही.
याआधी ईडीने ईश्वरलाल जैन यांच्या समूहाच्या जळगाव, नाशिक आणि ठाणे येथील १३ ठिकाणांवर धाड टाकून २५ कोटींची संपत्ती जप्त केली होती. ही कारवाई कजार्शी जुळलेल्या मनी लॉण्ड्रींग प्रकरणात राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा. लि., मनराज ज्वेलर्स प्रा. लि. आणि प्रमोटर्स ईश्वरलाल शंकरलाल जैन लालवानी, मनीष ईश्वरलाल जैन लालवानी, पुष्पादेवी आणि नितिका मनीष जैन लालवानी यांच्या ठिकाणांवर १७ ते १९ ऑगस्ट या कालावधीत सुरू होती.
ईश्वरलाल जैन शरद पवार यांचे निकटवर्तीय
ईश्वरलाल जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ वर्षे कोषाध्यक्ष होते. केंद्र सरकारकडून ईडीच्या माध्यमातून शरद पवार यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची राजकीय गोटात चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबीयांवर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप लावला आहे. त्याला घाबरून अजित पवार भाजपासोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. आता शरद पवार यांच्या निकटवतीर्यांवर ईडीची कारवाई करण्यात येत आहे.