महिलेचे आमिष दाखवून केले होते मनीष श्रीवासचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:08 AM2021-03-28T04:08:01+5:302021-03-28T04:08:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पाचपावलीतील कुख्यात गुन्हेगार मनीष श्रीवास याला एका महिलेचे आमिष दाखवून कामठीजवळच्या जंगलात नेण्यात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाचपावलीतील कुख्यात गुन्हेगार मनीष श्रीवास याला एका महिलेचे आमिष दाखवून कामठीजवळच्या जंगलात नेण्यात आले. तेथे एका घरात दडून असलेल्या रणजीत सफेलकर आणि साथीदारांनी मनीषची हत्या केली. त्याच्या मृतदेहाचे छोटे-छोटे तुकडे करून ते एका पोत्यात भरले आणि नंतर जमिनीत पुरले, अशी माहितीवजा कबुली आरोपी कालू आणि भरत हाटे या दोघांनी पोलिसांकडे दिल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज पत्रकारांना दिली.
बहुचर्चित मनीष श्रीवास अपहरण आणि हत्याकांडाचा छडा लावल्यानंतर पोलीस आयुक्तांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. या वेळी गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी आणि उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने उपस्थित होते.
या प्रकरणात कालू आणि भरत हाटे तसेच हेमंत गोरखा या तिघांना अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधार रंजीत सफेलकर तसेच इसाक मस्के, छोटू बागडे आणि अन्य काही आरोपींचा आम्ही लवकरच छडा लावू, असेही पोलीस आयुक्त म्हणाले.
आपसी वैमनस्यातून मनीष श्रीवासचे अपहरण करून हत्या करण्यात आली. गँगस्टर रंजीत सफेलकर याच्या सांगण्यावरून छोटू बागडेने बाईलवेडा असलेल्या मनीषला एक महिला आणली आहे, असे सांगून ४ मार्च २०१२ ला पवनगाव (धारगाव)मधील एका शेतातील घरात नेले. तेथे अन्य आरोपी आधीच लपून होते. मनीषवर त्यांनी हल्ला करून त्याची हत्या केली. मृतदेहाचे तुकडे करून एका पोत्यात भरले. ते कामठी जवळच्या एका निर्जन ठिकाणी नेऊन खड्डा करून पुरण्यात आले.
दरम्यान, अचानक गायब झालेल्या मनीषबाबत गुन्हेगारी वर्तुळात कुजबुज सुरू झाली तरी यासंबंधाने कोणी काही बोलायला तयार नव्हते. त्याच्या पत्नीवरही प्रचंड दडपण होते. त्यामुळे तब्बल चार वर्षे पत्नीही गप्प राहिली. मार्च २०१६ मध्ये तिने पाचपावली पोलीस ठाण्यात छोटू बागडेने मनीषचे अपहरण केल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे या प्रकरणाचा छडा लागला नाही. गेल्या १० वर्षांतील अनडिटेक्ट प्रकरणाचा आम्ही कानोसा घेतला. त्यात मनीष श्रीवाससोबतच निमगडे हत्याकांडाचेही धागे-दोरे आम्हाला कळाले आणि त्यातूनच या दोन्ही हत्याकांडांचा उलगडा करण्यात नागपूर पोलिसांना यश मिळाल्याचे पोलीस आयुक्त म्हणाले. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी कालू आणि भरत हाटे या दोघांना अटक केल्यानंतर त्यांनी या गुन्ह्याची कबुली देतानाच अन्य आरोपींची नावे सांगितली. घटनास्थळही दाखविल्याचे आयुक्त म्हणाले. त्यांच्या माहितीवरून आज हेमंत गोरखा यालासुद्धा अटक करण्यात आली. यासंबंधाने काही साक्षीदारही पोलिसांना मिळाले आहेत, असे आयुक्त म्हणाले. मनीषच्या मृतदेहाचे तुकडे तंदूरच्या भट्टीत जाळल्याची माहिती पुढे आली होती, याकडे लक्ष वेधले असता त्यांनी आरोपींनी तुकडे जाळले नाही, तर खड्ड्यात पुरल्याचे सांगितले आहे, असेही आयुक्त म्हणाले.
---
कोतुलवारने केली होती दिशाभूल
या हत्याकांडानंतर एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये मोंटी भुल्लरची १३ मार्च २०१२ ला हत्या झाली. ही हत्या करणारा आरोपी दिवाकर कोतुलवार याला पोलिसांनी पकडल्यानंतर त्याने मोंटीच्या हत्याकांडात मनीष श्रीवास सहभागी होता, असे सांगून पोलिसांची दिशाभूल केली होती. त्याच्यामुळे या हत्याकांडाच्या तपासाला अडथळा निर्माण झाला होता, असेही अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.
----
एक लाख रुपयांचे बक्षीस
नागपूरवर ‘क्राइम कॅपिटल’ असा ठपका लागला होता. रहस्यमय ठरलेल्या एकनाथ निमगडे आणि त्यानंतर मनीष श्रीवास या दोन हत्याकांडांचा पोलिसांनी उलगडा केला. आणखीही अनेक गुन्हे आम्ही उजेडात आणणार आहोत. गुन्हेगारी कमी करण्यातही यश मिळवणार आहोत. त्यामुळे नागपूरवरचा क्राइम कॅपिटलचा ठपका पुसून काढण्यात आम्हाला यश मिळेल, असा विश्वास पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला. या गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाला एक लाख रुपयांचा रोख पुरस्कार दिला जाणार असल्याचेही अमितेशकुमार यांनी जाहीर केले.
---