मनीष श्रीवासच्या हत्येचा उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:09 AM2021-03-27T04:09:11+5:302021-03-27T04:09:11+5:30

मनीष श्रीवासच्या हत्येचा उलगडा कुख्यात गुंड हाटे बंधूंकडून कबुली : पाच वर्षांनंतर अपहरणाच्या गुन्ह्यात हत्येचे कलम वाढवले लोकमत न्यूज ...

Manish Srivastava's murder revealed | मनीष श्रीवासच्या हत्येचा उलगडा

मनीष श्रीवासच्या हत्येचा उलगडा

Next

मनीष श्रीवासच्या हत्येचा उलगडा

कुख्यात गुंड हाटे बंधूंकडून कबुली : पाच वर्षांनंतर अपहरणाच्या गुन्ह्यात हत्येचे कलम वाढवले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कुख्यात गुंड मनीष श्रीवास याचे अपहरण करून हत्या केल्याची कबुली त्याचेच साथीदार कुख्यात कालू ऊर्फ शरद हाटे आणि त्याचा भाऊ भरत हाटे या दोघांनी पोलिसांकडे दिली. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी पाचपावली पोलिस ठाण्यात लावण्यात आलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यात आता हत्येचे कलमही वाढवण्यात आले आहे. लोकमतने महिनाभरापूर्वी ‘मनीष श्रीवास हत्याकांडाचा लवकरच उलगडा’, अशा मथळ्याचे वृत्त प्रकाशित केले होते, हे येथे विशेष उल्लेखनीय!

गुन्हे शाखा सूत्रांच्या माहितीनुसार, या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार कामठीचा गँगस्टर रणजित सफेलकर हा आहे. कालू आणि भरत हाटे हे त्याच्या टोळीतील प्रमुख गुंड आहेत. ही टोळी सुपारी किलिंग, खंडणी वसुली, जमिनी बळकावणे, हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण करणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यात अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. या टोळीत मनीष श्रीवास हासुद्धा सक्रिय होता. तो अत्यंत क्रूर होता. कुणाचीही हत्या करण्यास मागेपुढे पाहत नव्हता. सफेलकरच्या विरोधातील गुंडांच्या टोळीशी त्याने हातमिळवणी केल्यामुळे सफेलकरला त्याच्यापासून धोका निर्माण झाला होता. त्यामुळे त्याने मनीष श्रीवासच्या हत्येचा कट रचला आणि आपल्या गुंडांकडून त्याचे अपहरण करून घेतले. त्याला शेतात नेले. तेथे त्याची हत्या केली. त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते तंदूरच्या भट्टीत जाळले आणि त्याची राख नदीच्या पाण्यात फेकून दिली. या गुन्ह्याची गुन्हेगारी वर्तुळात जोरदार चर्चा होती. मात्र अतिशय खतरनाक गुंड यात सहभागी असल्याने कोणीही त्यासंबंधाने उघडपणे बोलत नव्हते. मनीष श्रीवासची पत्नी सावित्री हीदेखील प्रचंड दहशतीत होती. दरम्यान, तिला काही जणांनी धीर दिल्यामुळे तिने पाचपावली पोलिस ठाण्यात १ मार्च २०१६ ला मनीष श्रीवासचे काही गुंडांनी अपहरण केल्याची तक्रार नोंदवली. तेव्हा पोलिसांनी या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. परंतु आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश येत नव्हते.

---

अखेर प्रकरण उलगडले

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी नागपूर शहरातील अनडिटेक्ट मर्डरच्या फाइल्स बाहेर काढल्या आणि एकेका गुन्ह्याचा कसून तपास करण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर, मनीष श्रीवासची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांची नावे पुढे आली. महिनाभरापूर्वी पोलीस या हत्याकांडाचा सूत्रधार रणजित सफेलकर तसेच त्याचे राईट, लेफ्ट हॅन्ड कालू आणि भरत हाटे या दोघांची गोपनीय पद्धतीने चौकशी करीत असताना या गुंडांनी कुख्यात नब्बू याला पावणेदोन कोटीची सुपारी देऊन त्याच्याकडून बहुचर्चित एकनाथ निमगडे हत्याकांड घडवून आणल्याचेही पोलीस तपासात उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी त्या गुन्ह्यातील १४ पैकी ९ जणांना ताब्यात घेतले. प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे असल्यामुळे ते गुन्हेगार सीबीआयला सोपविण्यात आले तर सोमवारी फरार कालू आणि भरत हाटे या दोघांना अजमेरमध्ये तर नब्बूला मध्यप्रदेशात पोलिसांनी अटक केली. दोन दिवसाच्या चौकशीत त्यांनी मनीष श्रीवास याच्या अपहरण तसेच हत्येची कबुली देऊन तो घटनाक्रमही पोलिसांना सांगितल्याचे समजते.

---

मास्टरमाईंड टप्प्यात

या दोन्ही प्रकरणांतील मास्टरमाईंड रणजित सफेलकर टप्प्यात असून त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

---

Web Title: Manish Srivastava's murder revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.