मानवजन्म युद्धासाठी नव्हे, प्रेम आणि शांतीसाठी : भिक्खू संघसेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 09:41 PM2021-10-23T21:41:36+5:302021-10-23T21:42:07+5:30
Nagpur News मानवी जन्म युद्धासाठी नाही, तर प्रेम आणि शांतीच्या मार्गाने एकत्रित राहण्यासाठी आहे. हाच संदेश देण्यासाठी ‘लाेकमत’च्या परिषदेत आम्ही सर्व आलाे आहे, अशी भावना महाबाेधी आंतरराष्ट्रीय ध्यानसाधना केंद्र, लद्दाखचे संस्थापक भिक्खू संघसेना यांनी व्यक्त केली.
नागपूर : भगवान बुद्ध म्हणतात युद्धामुळे विनाश आणि दु:खाशिवाय काहीच प्राप्त हाेत नाही. आजच्या परिस्थितीतही तेच सत्य आहे. मानवी जन्म युद्धासाठी नाही, तर प्रेम आणि शांतीच्या मार्गाने एकत्रित राहण्यासाठी आहे. हाच संदेश देण्यासाठी ‘लाेकमत’च्या परिषदेत आम्ही सर्व आलाे आहे, अशी भावना महाबाेधी आंतरराष्ट्रीय ध्यानसाधना केंद्र, लद्दाखचे संस्थापक भिक्खू संघसेना यांनी व्यक्त केली.
परिषदेत सहभागी हाेण्यासाठी शनिवारी त्यांचे नागपूरला आगमन झाले. ‘लाेकमत’शी बाेलताना भिक्खू संघसेना म्हणाले, वर्तमान काळात नकारात्मकता, द्वेषातून हिंसात्मक परिस्थिती मानवाने तयार केली आहे. एकमेकांकडे दुर्लक्ष करणे, एकमेकांना समजून न घेणे, यामुळेच ही समस्या निर्माण झाली आहे. हिंसा किंवा द्वेष हे काेणत्याही समस्येचे समाधान नाही. यामुळे केवळ विनाशाचा अग्नी पेटतो. ही परिस्थिती बदलून शांती, साैहार्द, बंधुभाव, सर्व समानभाव निर्माण हाेणे गरजेचे आहे. सर्व मानवांच्या जन्माची प्रक्रिया एक आहे, शारीरिक रचना एक आहे आणि सर्वांना शांततामय वातावरण हवे आहे. लाेकांच्या मनात हा प्रकाश पेटविण्यासाठी आम्ही सर्व धर्मीय एकत्र आलाे असल्याचे भिक्खू संघसेना म्हणाले.
शिक्षण धाेरणात बदल करून त्यात विश्वशांतीचा, साैहार्दाचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे. युवा पिढी माेठी ताकद आहे. मात्र, साेशल मीडियामुळे त्यांच्या मनात नकारात्मक विचार टाकले जात आहेत. त्यांना सत्य माहिती पुरवून सकारात्मक मार्गावर नेणे गरजेचे आहे. यासाठी ‘लाेकमत’सारख्या विश्वसनीय माध्यमांवर माेठी जबाबदारी आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.