निर्मनुष्य वाळवंटात फडकवली यशाची पताका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 09:35 PM2018-02-08T21:35:39+5:302018-02-08T21:37:11+5:30
डॉ. सीमा पिनाक दंदे. व्यवसायाने डॉक्टर आहेत. धावण्याचा नि त्यांचा तसाही काही संबंध नाही. कच्छजवळील ढोलावीरा (गुजरात) येथे पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या ‘रन द रान’ या स्पर्धेत त्यांनी पाचवे स्थान पटकाविले आहे. असे यश मिळविणाऱ्या नागपुरातील पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या आहेत़.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. सीमा पिनाक दंदे. व्यवसायाने डॉक्टर आहेत. धावण्याचा नि त्यांचा तसाही काही संबंध नाही. पण, आपण रोज रुग्णांना फिटनेसचा सल्ला देतो, आरोग्य निरोगी राहावे म्हणून चालायला, धावायला सांगतो. स्वत: मात्र कधी धावतो का, असा प्रश्न त्यांना वयाच्या चाळीशीत पडला आणि धावायसाठी वय पाहायची गरजच काय असा विचार करून त्या धावायला लागल्या. स्वानंदासाठी जडलेल्या याच छंदाने त्यांना आज विशेष ओळख मिळवून दिली असून कच्छजवळील ढोलावीरा (गुजरात) येथे पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या ‘रन द रान’ या स्पर्धेत त्यांनी पाचवे स्थान पटकाविले आहे. असे यश मिळविणाऱ्या नागपुरातील पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या आहेत़. १२ तासांची महिलांसाठी ५१ किलोमीटर अंतर असलेली ही शर्यत त्यांनी ११ तास २३ मिनिटे १९ सेकंदात पूर्ण करून नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला़ आहे. 'नो मॅन्स लॅण्ड -डेझर्ट' म्हणजेच प्रचंड अंतर असणाºया निर्मनुष्य प्रदेशातील मॅरेथॉन. वाळवंटातून बाहेर पडल्यानंतर मिठागार प्रदेश, संयमाची परीक्षा पाहणारे छोटे पहाड, डोंगर असा वळणावळणाचा काटेरी जंगलाचा प्रवास. त्यात पुन्हा कपडे, अन्नपदार्थ, पाणी असे सुमारे आठ किलो वजनाचे ओझे खांद्यावर घेऊन धावायचे. सीमा दंदे यांनी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी धावायला सुरुवात केली. २९ अंश से. तापमानात त्या हातात ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम (जीपीएस) यंत्र घेऊन झपाटल्यागत धावत सुटल्या. मध्येच रस्ता चुकला. मोठे डॅम लागले. पण, स्पर्धेचे नियम तोडता येत नाहीत. अखेर बाभळीच्या काटेरी झाडाला पूल बनवून त्या पुढे गेल्या. शरीरावर असंख्य जखमा झाल्या. पण, प्रबळ आत्मविश्वास आणि ध्येयाप्रति समर्पण या बळावर त्यांनी या स्पर्धेत पदक मिळवलेच. त्यांनी या यशाचे श्रेय त्यांचे पती डॉ. पिनाक दंदे व प्रशिक्षकांना दिले आहे.
लोकमतनेच दिली धावण्याची प्रेरणा
लोकमतच्या सहकार्याने व प्रो हेल्थ फाऊंडेशनतर्फे २०१५ साली पाच किमी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. सीमा दंदे पहिल्यांदा धावल्या. या मॅरेथॉननेच त्यांना धावण्याची प्रेरणा दिली. पुढे सप्टेंबर-२०१७ मध्ये सातारा येथे अल्ट्रा हिल मॅरेथॉनमध्ये २१ किलोमीटरची शर्यत त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. यानंतर त्या ‘रन द रान’च्या आव्हानाला भिडल्या. त्यासाठी कन्हानजवळील बोखारा नदीच्या पात्रात कठोर परिश्रम घेतले आणि यशही मिळवले.