नागपुरातील मानमोडेंचा १०० कोटींचा मानहानीचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 10:02 PM2018-08-01T22:02:10+5:302018-08-01T22:05:25+5:30
निर्मल नगरीमध्ये १४.३५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची खोटी तक्रार प्रफुल्ल करपे यांनी दाखल करीत वैयक्तिक स्वार्थापोटी सोसायटीला वेठीस धरले. आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करीत निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-आॅप.सोसायटी (मल्टिस्टेट)चे सचिव प्रमोद मानमोडे यांनी करपे यांच्या विरोधात सत्र न्यायालयात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा व फौजदारी खटला देखील दाखल केला आहे. निर्मल नगरीच्या मेन्टेनन्सचे पैसे आजही फिक्स डिपॉझिटमध्ये सुरक्षित असून नंदनवन पोलिसांनी कुठलीही चौकशी न करता गुन्हा दाखल केला, यावर मानमोडे यांनी आश्चर्य व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निर्मल नगरीमध्ये १४.३५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची खोटी तक्रार प्रफुल्ल करपे यांनी दाखल करीत वैयक्तिक स्वार्थापोटी सोसायटीला वेठीस धरले. आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करीत निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-आॅप.सोसायटी (मल्टिस्टेट)चे सचिव प्रमोद मानमोडे यांनी करपे यांच्या विरोधात सत्र न्यायालयात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा व फौजदारी खटला देखील दाखल केला आहे. निर्मल नगरीच्या मेन्टेनन्सचे पैसे आजही फिक्स डिपॉझिटमध्ये सुरक्षित असून नंदनवन पोलिसांनी कुठलीही चौकशी न करता गुन्हा दाखल केला, यावर मानमोडे यांनी आश्चर्य व्यक्त केले.
मानमोडे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत निर्मल नगरीच्या मेन्टेनन्स निधीशी संबंधित कागदपत्रे सादर केली. ते म्हणाले, निर्मल नगरीमध्ये रो हाऊस, फ्लॅट व दुकानांचे गाळे असे एकूण ९४४ युनिट आहेत. यापैकी ६२० विकल्या गेले असून २६३ अद्यापही शिल्लक आहेत. विकलेल्या ६२० युनिटचे मेन्टेनन्सचे ७ कोटी २५ लाख ५० हजार रुपये संस्थेकडे जमा झाले. याशिवाय इलेक्ट्रीक कनेक्शन व पायाभूत सुविधांसाठी ४ कोटी ९४ लाख २० हजार ६६६ रुपये व पाणी मीटर कनेक्श्नसाठी १४ लाख ९ हजार ९९५ रुपये गोळा झाले. असे एकूण १२ कोटी ३३ लाख ८० हजार ६६१ रुपये जमा झाले. सर्व पैसे धनादेशाद्वारे घेतले असून ते सर्व रजिस्ट्रीमध्ये नमूद आहेत. यापैकी इलेक्ट्रीक व पाणी मीटरचे पैसे त्या त्या कारणासाठी खर्च करण्यात आले. सद्यस्थितीत निर्मल नगरीच्या ठेवीवर दरमहा ३ लाख ३२ हजार ३३ रुपये व्याज मिळते. मात्र, मेन्टेनन्सवर दरमहा ५ लाख ७१ हजार ८१७ रुपये खर्च होतात. ही २ लाख ३३ हजार रुपयांची तूट संस्थेच्या मेन्टेनन्सच्या रकमेतून भरली जाते. २०१२ पासूनचा हिशेब करता सद्यस्थितीत ५ कोटी ९२ लाख ६३ हजार ८१४ रुपये जमा असून ही संपूर्ण रक्कम निर्मल नगरीच्या मेन्टेनन्स हेडमध्ये फिक्स डिपॉझिट म्हणून जमा आहे.
नंदनवन पोलिसांनी १४ कोटींचा अपहार केल्याची तक्रार मिळताच कुठलीही चौकशी न करता गुन्हा दाखल केला. बँकेकडे संबंधित कागदपत्रांची मागणीही केली नाही. आपले बयाणही नोंदवून घेतले नाही. याउलट असे आरोप होताच आपण स्वत: सहकार आयुक्त, पुणे यांना पत्र पाठवून निर्मल नगरीच्या ठेवी व खर्चाचे आॅडिट करण्याची विनंती केली आहे. आॅडिटरच्या चौकशीत तथ्य समोर येईल. असे असतानाही करपे यांनी उलट सोसायटीच्या अध्यक्षांना पत्र पाठवून निर्मल नगरीचे पैसे त्यांनी स्थापन केलेल्या बोगस सोसायटीच्या खात्यात वळते करण्याची सूचना केली. तसे न केल्यास बदनाम करण्याची धमकी दिली. त्या धमकीनुसार ते आपल्याला बदनाम करण्यासाठी सर्व उठाठेवी करीत आहे, असा आरोपही मानमोडे यांनी केला. ६०० लोकांनी जमा केलेले पैसे या पाच लोकांनी स्थापन केलेल्या बोगस संस्थेला कसे वळते करायचे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
करपे विरुद्धच्या तक्रारीची दखल का नाही ?
प्रफुल्ल करपे यांनी निर्मल नगरी कंडोमिनीयम ही बोगस संस्था तयार करून रहिवाशांकडून पैसे उकळले. संस्थेची नोंदणी नसतानाही बनावट पावत्या दिल्याची लेखी तक्रार निर्मल नगरीतील प्रफुल्ल मनोहर शेंडे यांच्यासह नागरिकांनी नंदनवन पोलिसात केली होती. मात्र, त्या तक्रारीची पोलिसांनी साधी दखलही घेतली नाही. त्यावेळी करपे यांची चौकशी का करण्यात आली नाही, असा प्रश्न मानमोडे यांनी उपस्थित केला.