मनोज जयस्वाल यांची ५०३.१६ कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची पाच राज्यांमध्ये कारवाई

By मोरेश्वर मानापुरे | Published: October 28, 2024 08:43 PM2024-10-28T20:43:06+5:302024-10-28T20:43:29+5:30

ईडीने ही कारवाई काही दिवसांआधी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि आंध्र प्रदेश या पाच राज्यांमध्ये केली.

Manoj Jaiswal's property worth Rs 503.16 crore seized; ED action in five states | मनोज जयस्वाल यांची ५०३.१६ कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची पाच राज्यांमध्ये कारवाई

मनोज जयस्वाल यांची ५०३.१६ कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची पाच राज्यांमध्ये कारवाई

नागपूर : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) नागपूर उपक्षेत्रीय कार्यालयाने एका हाय-प्रोफाइल बँक फसवणूक प्रकरणात नागपूरस्थित उद्योजक मनोज जयस्वाल, त्यांची कॉर्पोरेट पॉवर लिमिटेड कंपनी आणि तिच्या इतर प्रवर्तकांची ५०३.१६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने ही कारवाई काही दिवसांआधी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि आंध्र प्रदेश या पाच राज्यांमध्ये केली.

यापूर्वी केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने (सीबीआय) युनियन बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीनंतर केलेल्या एफआयआरनंतर ईडीने तपास हाती घेतला होता. सीबीआयने या समूहाच्या विरोधात गुन्हेगारी कट, फसवणूक आणि खोटेपणा अशा आरोपाचे गुन्हे नोंदवले होते. आरोपींनी कर्ज मिळविण्यासाठी प्रकल्प खर्च विवरणपत्रात फेरफार केली आणि बँकेच्या निधीचा गैरवापर केला. त्यामुळे ४,०३७ कोटी रुपयांचे (व्याजासह ११,३७९ कोटी रुपये) नुकसान झाल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला होता. त्यानंतर ईडीनेही मनी लाँड्रिंग कायद्याच्या उल्लंघनांवर त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या आधारावर कारवाई सुरू केली. ईडीच्या पाठपुराव्याच्या कारवाईत आरोपींवर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यातील (पीएमएलए-२००२) तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला होता.

ईडीने याआधी केलेल्या कारवाईत नागपूर, कोलकाता आणि विशाखापट्टणम येथून सूचीबद्ध शेअर्स आणि सिक्युरिटीज, म्युच्युअल फंड, मुदत ठेवी आणि बँक बॅलन्समधील एकूण २२३.३३ कोटी रुपये आणि ५५.८५ लाखांची रोख रक्कमही जप्त केली होती. 

जप्त मालमत्तांमध्ये कॉर्पोरेट पॉवर लिमिटेड आणि त्यांचे प्रवर्तक आणि संचालक मनोज जयस्वाल, अभिजीत जयस्वाल, अभिषेक जयस्वाल आणि इतरांच्या कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त विविध शेल कंपन्यांच्या नावावर घेतलेल्या जमिनीवरील मालमत्ता, शेअर्स, बँक शिल्लक, म्युच्युअल फंड, विविध आणि इमारतींचा समावेश आहे. या प्रकरणात ईडीने आजपर्यंत एकूण अंदाजे ७२७ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

Web Title: Manoj Jaiswal's property worth Rs 503.16 crore seized; ED action in five states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.