मानोरा जि.प. शाळेची घंटा वाजणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:07 AM2021-07-20T04:07:49+5:302021-07-20T04:07:49+5:30
भिवापूर : लॉकडाऊनमुळे शाळेची दारे कुलूपबंद झाली. तब्बल दीड वर्षाच्या प्रतीक्षेअंती आता तालुक्यातील मानोरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची घंटा ...
भिवापूर : लॉकडाऊनमुळे शाळेची दारे कुलूपबंद झाली. तब्बल दीड वर्षाच्या प्रतीक्षेअंती आता तालुक्यातील मानोरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची घंटा वाजणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असून विद्यार्थ्यांची जबाबदारीही स्वीकारली आहे.
पहिली लाट ओसरताच कुलूपबंद असलेल्या शाळांची दारे काहीशी उघडली गेलीत; मात्र त्यानंतर लागलीच कोरोनाने पुन्हा तोंड वर काढले. प्रशासनाने पुन्हा लॉकडाऊन करत शाळा कुलूपबंद करण्याचा निर्णय घेतला. आता संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे राज्यशासनाने शाळांची दारे उघडण्याचा निर्णय घेतला; मात्र त्यासाठी काही अटी, शर्ती व नियमावली ठेवल्या आहेत. यात प्रामुख्याने या गावात कोरोनाचा रुग्ण नसावा आणि शाळा सुरू करण्याबाबत संबंधित ग्रामपंचायत, नगरपंचायतीचा ठराव असावा असे यात नमूद आहे. भिवापूर तालुक्यात १३७ गावांचा समावेश असून जिल्हा परिषदेच्या १०६ शाळा आहेत. समाजकल्याण विभागामार्फत ३ आश्रमशाळा, १६ अनुदानित शाळा, ५ विनाअनुदानित शाळा अशा एकूण १३० शाळा आहे. यातील बहुतांश शाळांनी शाळा सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे; मात्र कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेचे भय कायम असल्यामुळे ग्रामपंचायत, नगरपंचायतीने त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळा सुरू करण्याबाबत ठराव घेण्याची पाऊले बहुतांशी उचललेली नाही. त्यामुळे बहुतांश शाळा अद्यापही बंदच आहे. अशातच तालुक्यातील मानोरा ग्रामपंचायतीने सोमवारी गावातील जिल्हा परिषद शाळा सुरू करण्याबाबत ठराव घेतला. या आशयाचे नाहरकत प्रमाणपत्र सरपंच मिथून माटे (प्रभारी) यांनी मुख्याध्यापक वंदना डेकाटे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद गोमकर यांना दिले. यावेळी ग्रामसेवक सुरेश भुरे व शिक्षक संदीप जुआरे उपस्थित होते.
रुग्ण आढळला, निर्णय थांबला
भिवापूर नगरपंचायत क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासंदर्भात गत शनिवारला मुख्याधिकारी सुवर्णा दखने यांनी नगरपंचायतमध्ये सर्व मुख्याध्यापक व प्राचार्यांची बैठक घेतली. यात शाळा सुरू करण्याबाबत सर्वांचे एकमत झाले होते; मात्र त्याच वेळी आरोग्य विभागातून नगरपंचायतीला फोन आला. आंध्रप्रदेशातून शहरात आलेली एक महिला कोविड पॉझिटिव्ह असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय तेथेच थांबला.
190721\img-20210719-wa0090.jpg
मानोरा येथील सरपंच मिथून माटे (प्रभारी) हे मुख्याध्यापक वंदना डेकाटे व शाळा समितीचे अध्यक्ष प्रमोद गोमकर यांना शाळा सुरू करण्यासंदर्भात पञ देतांना