मनोरुग्णालय नव्हे जुगार अड्डा

By admin | Published: July 4, 2016 02:26 AM2016-07-04T02:26:03+5:302016-07-04T02:26:03+5:30

सरकारी अनास्थेच्या मेंटल ब्लॉकमुळे प्रादेशिक मनोरुग्णालयाची अवस्था कोंडवाड्यासारखी झाली आहे.

Manoraginal not gambler haunt | मनोरुग्णालय नव्हे जुगार अड्डा

मनोरुग्णालय नव्हे जुगार अड्डा

Next

रुग्णांच्या जेवणाच्या शेडखाली उघडपणे चालतो जुगार : सर्वच मूकदर्शक
सुमेध वाघमारे/
विशाल महाकाळकर नागपूर
सरकारी अनास्थेच्या मेंटल ब्लॉकमुळे प्रादेशिक मनोरुग्णालयाची अवस्था कोंडवाड्यासारखी झाली आहे. लालफितीची मनमानी, अपुरा निधी, औषधांचा तुटवडा, डॉक्टरांची कमतरता, पर्यायी उपचारांची वानवा अशा त्रुटींमुळे इथल्या कारभाराचा बोजवारा उडाला आहे. आता याचा फायदा येथील कर्मचारीही घेऊ लागले आहेत. काही सफाई कर्मचारी आणि अटेंडंटनी मिळून थेट रुग्णालयातच जुगाराचा अड्डा सुरू केला आहे. मनोरुग्णांच्या जेवणासाठी जिथे शेड तयार केले आहे, तिथेच जुगार खेळला जात आहे. रुग्णांना वाऱ्यावर सोडून सुरू असलेल्या या प्रकाराचे डॉक्टरांपासून ते परिचारिका सर्वच मूकदर्शक झाल्याचे वास्तव आहे.

मनोरुग्णालयात जुगार खेळला जात असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली. त्याची शहानिशा करण्यासाठी ‘लोकमत चमू’ने मनोरुग्णालय गाठले. परंतु रुग्णालयाच्या आत जाऊन छायाचित्र घेणे शक्य नव्हते. यामुळे रुग्णालयाच्या मागील संरक्षण भिंतीवर चढून पाहणी केली असता, हा धक्कदायक प्रकार समोर आला.
मनोरुग्णांवर योग्य औषधोपचार करून त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता यावे, यासाठी इंग्रजांनी महाराष्ट्रात चार मनोरुग्णालयाची स्थापना केली. यातील एक प्रादेशिक मनोरुग्णालय नागपुरात आहे. मात्र, सरकारी अनास्थेमुळे या रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. दररोजच्या ताणतणावांमुळे मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. असे असताना आजही जुन्याच पद्धतीचे येथे उपचार व औषधांचा वापर सुरू आहे. वेड्यांकडे काय लक्ष द्यायचे, अशा भावनेतूनच या खात्याचे काम सुरू असल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत रुग्णालयात ३६५ पुरुष तर ३०२ महिला उपचार घेत आहेत. त्यांच्या सेवेसाठी डॉक्टर, परिचारिकांसोबतच १७० अटेंडंट व ४० सफाई कर्मचारी आहेत. परंतु त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने की काय याचा फायदा काही अटेंडंट व सफाई कर्मचारी घेत आहेत. रुग्णसेवेला बगल देत गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जुगार खेळला जात आहे.

सायंकाळपर्यंत चालतो जुगार
सूत्रानुसार, वॉर्ड क्र. १५ च्या बाजूला रुग्णांच्या जेवणाचे शेड आहे. दुपारी २ वाजतापासून जुगाराला सुरुवात होते. हा जुगार अंधार पडेपर्यंत साधारण ६-७ वाजेपर्यंत चालतो. रुग्णांना वाऱ्यावर सोडून या जुगारात अनेकजण सहभागी होतात. या शेडच्या बाजूला वॉर्ड क्र. १६ तर काही अंतरावर वॉर्ड क्र. ११ ते १४ वॉर्ड आहेत. जवळच गुन्हेगारांना ठेवण्यात येणारा वॉर्ड क्र. १२ आहे. यामुळे या भागात डॉक्टरांपासून ते परिचारिकांची सर्वांची वर्दळ असते. परंतु गुंड प्रवृत्तीच्या या कर्मचाऱ्यांमुळे सर्वच गप्प राहत असल्याची माहिती आहे.

तोंडी तक्रारीनंतरही कारवाई नाही
सूत्राच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी रुग्णालयात जुगार खेळला जात असल्याची तक्रार एका परिचारिकेने हिंमत करून वैद्यकीय अधीक्षकांकडे केली, परंतु कारवाई झालेली नाही. लेखी तक्रार नसल्याने कारवाई झाली नसल्याचे बोलले जाते.

Web Title: Manoraginal not gambler haunt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.