मनपाला ४० ई-बसची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:08 AM2021-03-09T04:08:36+5:302021-03-09T04:08:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नवीन वर्षात महापालिकेच्या बसच्या ताफ्यात ४० ई-बसेस दाखल होणार होत्या. दोन महिने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवीन वर्षात महापालिकेच्या बसच्या ताफ्यात ४० ई-बसेस दाखल होणार होत्या. दोन महिने झाले, तरी अद्याप एकही बस आलेली नाही. परिवहन विभागाने केलेल्या सूचनांनुसार सुरुवातीला एक बस येणार होती. पसंतीनंतर अन्य बस बनविल्या जाणार होत्या. मात्र, सुरुवातीलाच बस आली नसल्याने परिवहन विभागाला ४० ई-बसची आणखी काही महिने प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
केंद्र सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयातर्फे कर्ज स्वरूपात १०० इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी निधी देण्याचा प्रस्ताव महापालिकेने नाकारला होता. त्यानंतर, झालेल्या सामंजस्य करारानुसार केंद्र सरकारने मनपाला ४० ई-बसेस खरेदीसाठी १४.४ कोटींचा निधी मंजूर केला आहे. अनुदानाच्या स्वरूपातील या निधीतून ३.६० कोटींचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. नवीन वर्षात या बस आपली बसच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची घोषणा परिवहन विभागाने केली होती.
करारानुसार अवजड उद्योग मंत्रालयाने मिडी, स्टॅण्डर्ड आणि मिनी बस खरेदीसाठी अनुक्रमे ४५ लाख, ५५ लाख आणि ३५ लाख देण्याची तयारी दर्शविली. यातील मिडी बस खरेदीसाठी मनपाने सकारात्मकता दाखविली. या ४० मिडी बसेस तेलंगणा येथे तयार झालेल्या आहेत. ही ओलेक्ट्रा बस १.४९ कोटींची आहे. या कंपनीने मनपाला बस संचलनाची तयारीही दर्शविली होती. मनपा यासाठी कंपनीला ४० बसच्या मूळ किमतीसह प्रति किलोमीटर ६६.३० पैसे देण्यास तयार झाली. त्यामुळे कोणतीही अतिरिक्त गुंतवणूक न करता, मनपाला ही सेवा देता येणे शक्य होणार आहे. पहिल्या टप्प्यात २०२१ मध्ये २० इलेक्ट्रिक बस शहरात दाखल होणार होत्या, तर दुसऱ्या टप्प्यातील ७.२० कोटींचा निधी बसेस आल्यावर मिळणार होता. बस न आल्याने मिळणारा निधीही लांबणीवर पडला आहे.
...
लॉकडाऊन संपताच बस वाढणार!
कोरोनामुळे परिवहन विभागाच्या सेवेवर परिणाम झाला आहे. सध्या ३३६ पैकी २७० बस शहरात धावत आहेत. लॉकडाऊन संपताच पूर्ण बस शहरात धावतील, अशी माहिती परिवहन सभापती बाल्या बोरकर यांनी दिली.
...
निधी परत जाण्याची शक्यता
केंद्र सरकारने मनपाला ४० ई-बसेस खरेदीसाठी १४.४ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यातील ३.६० कोटींचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. २० ई-बस आल्यानंतर निधीचा दुसरा हप्ता मिळणार आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातील निधी अखर्चित राहिल्यास दुसऱ्या टप्प्यातील निधी परत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.