मनपाने एम्प्रेस मॉलपुढे वाजवला ढोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 02:08 AM2017-07-19T02:08:58+5:302017-07-19T02:08:58+5:30
निवडणुकीत विकासाची ग्वाही दिली, परंतु महापालिकेची तिजोरी रिकामी असल्याने विकासाचे नियोजन बिघडले आहे.
वसुलीसाठी गांधीगिरी : २० बड्या थकबाकीदारांचाही समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणुकीत विकासाची ग्वाही दिली, परंतु महापालिकेची तिजोरी रिकामी असल्याने विकासाचे नियोजन बिघडले आहे. तिजोरी भरण्यासाठी ४५२ कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी बड्या थकबाकीदारांच्या घरापुढे ‘गांधीगिरी’करीत ढोल वाजवण्याला मंगळवारी सुरुवात करण्यात आली. सर्वाधिक थकबाकी असलेल्या गांधीसागर येथील एम्प्रेस मॉलसह बड्या थकबाकीदारांच्या घरापुढे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ढोल वाजविण्यात आला.
धंतोली झोनचे सभापती प्रमोद चिखले व माजी सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, जलप्रदाय समितीचे सभापती राजेश घोडपागे, दुर्बल घटक विशेष समितीचे सभापती महेंद्र धनविजय आदींच्या नेतृत्वात एम्प्रेस मॉलच्या प्रवेशद्वारापुढे ढोल बडवून मॉल व्यवस्थापनाला थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यात आले.
थकीत मालमत्ता आणि पाणीपट्टी असलेल्या ग्राहकांसाठी महापालिकेने अभय योजना आणली आहे. १७ जुलै ते ७ आॅगस्टदरम्यान ही योजना राबविली जात आहे. थकीत कर भरा आणि मालमत्तेवरील जप्तीची कारवाई टाळा, असे आवाहन करण्यात आले आहे.
काही निवडक व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि नागरिकांकडे कोट्यवधींचा कर थकबाकी आहे. अशा थकबाकीदारांना जागे करण्यासाठी महापालिकेने गांधीगिरीचा मार्ग स्वीकारला आहे. महापालिकेच्या १० झोनमधील ‘टॉप टेन’ थकबाकीदारांच्या प्रतिष्ठानांपुढे आणि घरांपुढे ढोल वाजविण्यात आले.
आसीनगरातही वाजला बँड
आसीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या नारायण जयराम लवात्रे यांच्या घरासमोर ढोल बडविण्यात आला. त्यांना पुष्पगुच्छ देण्यात आले. त्यांच्याकडे मालमत्ता कराचे २ लाख ६६ हजार मालमत्ता थकीत आहे. या कारवाईत आसीनगर झोन सभापती भाग्यश्री कानतोडे, बसपाचे पक्षनेते शेख मोहम्मद जमाल, नगरसेविका भावना लोणारे, मनोज सांगोळे, परसराम मानवटकर, गोपीचंद कुमरे, जितेंद्र घोडेस्वार, मो. इब्राहिम तौफिक अहमद, संदीप सहारे, झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
कंट्रीवाईडचा परिसर दणाणला
धरमपेठ झोनअंतर्गत येणाऱ्या भगवाघर ले-आऊट येथील कंट्रीवाईड व्हॅकेशन आणि हिबिस्कस हॉटेल येथे ढोल वाजविण्यात आला. कंट्रीवाईड व्हॅकेशन यांच्याकडे १७ लाख रुपयांचा कर थकीत आहे. यापैकी पाच लाखांचा डीडी मालमत्ता मालकाने आज अधिकाऱ्यांकडे सोपविला. उर्वरित रक्कम २५ तारखेपर्यंत भरण्याचे आश्वासन त्यांनी दिले. हिबिस्कस हॉटेल यांच्याकडे १४.५० लाखांचा कर थकीत आहे. ही रक्कम २४ जुलैपर्यंत भरणार असल्याचे आश्वासन मालमत्ताधारकाने दिले. या कारवाईच्या वेळी स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेवक प्रमोद कौरती, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, डॉ. परिणिता फुके, प्रगती पाटील, रुतिका मसराम, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे आदी उपस्थित होते.
सरदारजीकी रसोईपुढेही घुमला ढोल
लक्षमीनगर झोनमधील सरदारजीकी रसोई येथे सभापती प्रकाश भोयर यांच्या नेतृत्वात नगारा वाजविण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिष्ठानासमोर बॅनर लावण्यात आले. शटर बंद असल्यामुळे प्रवेशद्वारासमोर पुष्पगुच्छ ठेवण्यात आले. या रसोईकडे ५६ लाख २२ हजार रुपयांची थकबाकी आहे. विधी समिती सभापती अॅड. मीनाक्षी तेलगोटे, नगरसेवक लहुकुमार बेहते, नगरसेविका पल्लवी शामकुळे, सोनाली कडू, विशाखा मोहोड, जयश्री वाडीभस्मे यांची उपस्थिती होती.