लसीकरणासाठी मनपातर्फे मोबाईलवर संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:07 AM2021-03-20T04:07:49+5:302021-03-20T04:07:49+5:30
सध्या नागपुरात २७ शासकीय केंद्रांमध्ये नि:शुल्क लसीकरण केले जात आहे तसेच ४५ खासगी रुग्णालयांमध्ये शासकीय दरानुसार लसीकरणाची व्यवस्था करण्यात ...
सध्या नागपुरात २७ शासकीय केंद्रांमध्ये नि:शुल्क लसीकरण केले जात आहे तसेच ४५ खासगी रुग्णालयांमध्ये शासकीय दरानुसार लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व केंद्रांमध्ये लसीकरणाची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी लसीकरणासाठी आपले नाव ऑनलाईन नोंदणी करावे. झोनल कार्यालयामध्ये सुध्दा ऑनलाईन नोंदणी करण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. लसीकरण केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या नागरिकांना प्राथमिकता दिली जात आहे.
ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांसाठी लसीकरण केंद्रावर वेगळी रांग
नागपूर : शहरात सुरू असलेल्या सर्व लसीकरण केंद्रांवर ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करणाऱ्यांना लस दिली जात आहे. मात्र यामध्ये आधीच ऑनलाईन नोंदणी करून आलेल्यांना पुन्हा प्रतीक्षेत राहावे लागत असल्याचे दिसून येते. त्यामुळे लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना प्राथमिकता देण्यात यावी यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांची लसीकरण केंद्रावर वेगळी रांग असावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले आहेत.
ईएसआयएस लसीकरण केंद्रावर ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांची लस घेण्यासाठी एकच रांग असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे व्यवस्थित पालन होत नसल्याचेही दिसून आले. अशीच समस्या इतरही लसीकरण केंद्रांवर असल्याने ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी करणाऱ्यांसाठी वेगळी रांग करण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत. ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना लसीकरणासाठी प्राथमिकता देण्यात यावी, असेही त्यांनी नमूद केले. लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये व सुरळीतरीत्या लसीकरण कार्यक्रम पार पाडावा, यासाठी महापौरांनी सूचना केली आहे.
सदर व पाचपावली येथे ‘कोविड केअर सेंटर’ तातडीने सुरू करा
- नागपूर : शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या ही चिंतेची बाब आहे. शहरातील कोरोनाबाधितांना वेळेवर योग्य उपचार मिळावे यासाठी शहरातील आयुष दवाखाना, सदर व पाचपावली येथील ‘कोविड केअर सेंटर’ लवकरात लवकर सुरू करण्याबाबत कार्यवाही करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी प्रशासनाला दिले.
मागील वर्षी कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शहरात आयुष दवाखाना, सदर व पाचपावली रुग्णालयांमध्ये ‘कोविड केअर सेंटर’ सुरू करण्यात आले होते. यावर्षी पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या रोजच वाढत आहे. यादृष्टीने मनपाची आरोग्य यंत्रणा उत्तम कार्य करत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना आवश्यक ते उपचार योग्यवेळी दिले जावेत यासाठी मनपाची दोन्ही ‘कोविड केअर सेंटर’ महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे ही दोन्ही केंद्र पुन्हा एकदा सुरू करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याबाबत महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याशी चर्चा केली.