पाण्यावरून मनपात वादळ

By admin | Published: March 20, 2016 02:57 AM2016-03-20T02:57:11+5:302016-03-20T02:57:11+5:30

उन्हाळा तापायला लागला तसा शहरात पाणी प्रश्नही निर्माण झाला आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर महानगरपालिके त पाण्यावरून राजकारणही तापले आहे.

Mantra storm on the water | पाण्यावरून मनपात वादळ

पाण्यावरून मनपात वादळ

Next

काँग्रेसचा ओसीडब्ल्यू व महापौरांवर हल्लाबोल
नागपूर : उन्हाळा तापायला लागला तसा शहरात पाणी प्रश्नही निर्माण झाला आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर महानगरपालिके त पाण्यावरून राजकारणही तापले आहे. शहरातील अनेक भागात निर्माण झालेली पाणीटंचाई, वाढलेले पाण्याचे बिल आणि वाढीव मालमत्ता कराच्याविरोधात शनिवारी काँग्रेस पक्षातर्फे महानगरपालिकेत निदर्शने करण्यात आली.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात शनिवारी ३.३० वाजताच्या सुमारास मनपाच्या मुख्य दालनासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनात पक्षाचे नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. सुरुवातीला कार्यकर्त्यांनी महापौर तसेच सत्तापक्षाच्या विरोधात तीव्र नारेबाजी केली. घोषणाबाजीदरम्यान हे आंदोलन अधिकच तीव्र होत गेले व कार्यकर्त्यांनी पाण्याचे माठ फोडून आपला निषेध नोंदविला. नंतर हा मोर्चा महापौर प्रवीण दटके यांच्या कक्षाकडे वळविण्यात आला. महापौरांच्या कक्षातही कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली. यादरम्यान महापौरांना समस्यांचे निवेदन सादर करण्यात आले. शहरातील अनेक भागात लोकांच्या नळाला पाणी येत नसल्याच्या तक्रारी केल्या. ओसीडब्ल्यू कंपनीने २४बाय७ योजनेअंतर्गत जुने मीटर काढून नवे मीटर लावण्याचे व नवी पाईपलाईन टाकण्याचे कामही केले. मात्र यामुळे २४ तास पाणी मिळण्याऐवजी आधी मिळत होते, तेवढेही पाणी मिळणे बंद झाल्याची तक्रार देत ओसीडब्ल्यूचे कंत्राट रद्द करण्याची मागणी काँग्रेसने केली. विशेष म्हणजे ओसीडब्ल्यूचे अधिकारी यावेळी महापौर कक्षात उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी त्यांनाही धारेवर धरले. महापौरांच्या सकारात्मक आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले, मात्र बाहेर पडताना कार्यकर्त्यांनी महापौर कक्षाबाहेरही पुन्हा पाण्याचे माठ फोडून असंतोष दर्शविला. आंदोलनामध्ये ठाकरे यांच्यासह अ‍ॅड. अभिजित वंजारी, नगरसेविका सुजाता कोंबाडे, योगेश तिवारी, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, जॉन थॉमस, सतीश भगत, उमाकांत अग्निहोत्री, परमेश्वर राऊत, नगरसेविका प्रेरणा कापसे, राजश्री पन्नासे, निमिषा शिर्के, रेखा बाराहाते, उज्ज्वला बनकर, भावना लोणारे, शीला मोहोड, कांता पराते, लीला म्हैसकर, प्रज्ञा गावंडे, संजय मेश्राम, इंद्रसेन ठाकूर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)

Web Title: Mantra storm on the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.