मनुस्मृती संतांपेक्षा श्रेष्ठ नाही, भुजबळांकडून भिडेंच्या वक्तव्याचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 08:43 PM2018-07-08T20:43:37+5:302018-07-08T20:45:52+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. भिडे गुरुजींनी केलेल्या वक्तव्याचा भुजबळ यांनी निषेध नोंदवला.
नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. भिडे गुरुजींनी केलेल्या वक्तव्याचा भुजबळ यांनी निषेध नोंदवला. तसेच महात्मा फुलेंनी मनुस्मृती जाळून टाका असे आवाहन केल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. नागपूर विमानतळावर पोहोचताच भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस, समता परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेराव घालत त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी भुजबळांनी डोक्यावर फुले पगडी परिधान केली होती.
संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांपेक्षा मनु श्रेष्ठ आहेत, असे वक्तव्य शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले होते. पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये दाखल होण्यासाठी संभाजी भिडे शनिवारी पुण्यात दाखल झाले होते. त्यावेळी दुपारी त्यांनी आपल्या धारकऱ्यांना जंगली महाराज मंदिरात संबोधित केले. या संबोधनावेळी बोलताना, संतापेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ असल्याचे भिडेंनी म्हटले. मात्र, भिडे गुरुजींच्या या वक्तव्याचा भुजबळ यांनी नागपुरात पोहोचताच निषेध केला. सर्व संतांनी मानवतेत एकता आणली, कधीही भेद केला नाही. मात्र, मनुस्मृतीने काहींनाच श्रेष्ठ मानले. मनुस्मृतीने 97 टक्के लोकांना क्षुद्र ठरविले. त्यामुळेच महात्मा फुलेंनी मनुस्मृती जाळून टाका, असे आवाहन केले होते. तर बाबासाहेब आंबेडकरांनी ती जाळली, असेही भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान, संभाजी भिडेंच्या वक्तव्यावरुन चांगलेच वादळ निर्माण झाले असून काही राजकीय नेत्यांनी या वक्तव्यावरुन भिडेंना लक्ष्य केले आहे.