बाद नोटा फाडणार अनेकांचे बुरखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 02:18 AM2017-08-06T02:18:37+5:302017-08-06T02:20:11+5:30
चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटांच्या बदल्यात कोट्यवधींच्या नवीन नोटा मिळवण्याचा गोरखधंदा करणारे रॅकेट पोलिसांच्या रेकॉर्डवर आल्यानंतर संबधित वर्तुळातील धावपळ वाढली आहे.
नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटांच्या बदल्यात कोट्यवधींच्या नवीन नोटा मिळवण्याचा गोरखधंदा करणारे रॅकेट पोलिसांच्या रेकॉर्डवर आल्यानंतर संबधित वर्तुळातील धावपळ वाढली आहे. या रॅकेटमध्ये दोन डझनपेक्षा जास्त आरोपींचा सहभाग असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी पोलीस नागपूर- वर्ध्यापासून औरंगाबाद, अहमदनगरपर्यंत धावपळ करीत आहेत.
रॅकेटमधील बड्या तसेच लब्धप्रतिष्ठित आरोपींचा बुरखा फाटू नये म्हणून त्यांना कारवाईच्या टप्प्यातून बाहेर ठेवण्यासाठी आरोपींच्या साथीदारांनी दलालांच्या माध्यमातून आटापिटा चालविला आहे. यासंबंधाने वेगवेगळ्या जणांसोबत दलालांचा संपर्क सुरू आहे. आरोपीच्या बचावासाठी वेगवेगळी किंमत (लाखोंची!) मोजण्याची तयारीही दलाल दाखवत आहे. पोलीस आणि दलालांमधील या घडामोडी गोपनीय पद्धतीने सुरू असल्या तरी ‘सतर्कता पथक’ या धावपळीवर नजर ठेवून आहे.
कोराडी मार्गावरील वॉक्स कुलर चौकाजवळ राणा अपार्टमेंटमध्ये मंगळवारी १ आॅगस्टच्या सायंकाळी गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. ३०१ क्रमांकाच्या सदनिकेत प्रसन्ना मनोहर पारधी याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याजवळून चलनातून बाद झालेल्या ९७ लाख ५० हजार रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या. यावेळी तेथून सदरमधील कापड व्यापारी कुमार चुगानी (रा. खरे टाऊन), रुषी खोसला आणि त्यांचे डझनभर साथीदार पसार झाले. या कारवाईनंतर नोटांच्या अदलाबदलीचा गोरखधंदा करणाºया रॅकेटमध्येच नव्हे तर पोलीस दलातही ‘वेगवेगळ्या कारणामुळे‘ खळबळ उडाली. पोलिसांना येथे दोन ते तीन कोटी रुपये आणि ८ ते १० आरोपी असल्याची टीप मिळाली होती. प्रत्यक्षात एक कोटींपेक्षा कमी रक्कमेच्या बाद नोटा पोलिसांच्या हाती लागल्या. आरोपीदेखील केवळ एकच मिळाला. त्यामुळे ही कारवाई उलटसुलट चर्चा निर्माण करणारी ठरली आहे. दुसरीकडे बँक अधिकारी ‘एक्स्चेंज डील’साठी येणार, अशी माहिती असताना तेथे बँकेच्या अधिकाºयांऐवजी पोलीस पोहचले.
त्यामुळे या गोरखधंद्यात सहभागी असणारांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. जुन्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या. त्याची या आरोपींना फारशी खंत किंवा भीती नाही. पोलिसांनी आणखी आरोपींना अटक केल्यास त्यांचे बुरखे फाटू शकतात, अनेक धक्कादायक बाबी उघड होऊ शकतात, ही भीती त्यांना सतावत आहे. त्यामुळे या गोरखधंद्यातील आरोपींच्या बचावासाठी वेगवेगळे दलाल कामी लागले आहे.
कुणी कुणाशी तर कुणी कुणाशी संपर्क करीत आहेत. कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल मात्र ‘अपने आदमी का नाम नही आना चाहिये’ अशी अट दलाल घालत आहे.
या पार्श्वभूमीवर दलालांनी पोलीस दलातील काही वादग्रस्त व्यक्तींसोबतही संपर्क सुरू केल्याची माहिती आहे. या प्रकरणात ‘हासिम‘ नामक दलालाची धावपळ चर्चेचा विषय ठरली आहे. स्वत:ला पोलिसांच्या जवळचे भासविणाºया आणि अनेक प्रकरणात मांडवली करणाºया काही वादग्रस्त व्यक्तींच्या तो संपर्कात आहे. या मंडळींनी यापूर्वी मोठमोठ्या प्रकरणाला कलाटणी दिली आहे. त्यामुळे हासिम या प्रकरणावर पडदा पडण्यात यशस्वी होऊ शकतो,असे संबंधित सूत्रांचे मत आहे.
हॉटेलमध्ये होता मुक्काम
या प्रकरणाच्या संबंधाने सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन आठवड्यांपासून नोटा अदलाबदलीसाठी चुगानी, पारधी खोसला आणि त्यांचे साथीदार बाहेरच्या डॉक्टर, व्यापाºयांच्या संपर्कात होते. एकाच वेळी डील फायनल करण्याची त्यांनी योजना आखली होती. त्यासाठी बाहेरून नोट घेऊन आलेल्या मंडळींना एका पॉश हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. एक आठवड्यापासून हॉटेलात मुक्कामी असलेल्या या मंडळींसाठी विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. एसीपी सोमनाथ वाघचौरे आणि सहायक निरीक्षक सचिन लुले ज्यावेळी राणा अपार्टमेंटमध्ये शिरले त्यावेळी सुमारे २० कोटींच्या नोटा सदनिकेच्या खाली उभ्या असलेल्या वाहनात होत्या. पोलिसांना धक्काबुक्की करीत पारधीचे काही साथीदार पळून गेले. त्यांनी वाहनात नोटा घेऊन बसून असलेल्यांनाही पळवून लावले. पोलीस आता त्यांना शोधण्यासाठी वर्धा, अहमदनगरसह ठिकठिकाणी धावपळ करीत आहे.