दिल्ली संमेलनातून विदर्भात आले अनेकजण; जिल्ह्याजिल्ह्यात त्यांचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 04:42 PM2020-04-01T16:42:14+5:302020-04-01T16:42:58+5:30
दिल्लीच्या निजामुद्दीन भागात झालेल्या संमेलनात सहभागी होण्यासाठी विदर्भातून अनेक नागरिक गेले होते. चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया आदी ठिकाणांहून हे नागरिक सहभागी झाले होते. कोरोना संसर्गजन्याच्या पार्श्वभूमीवर या परतलेल्या नागरिकांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: दिल्लीच्या निजामुद्दीन भागात झालेल्या संमेलनात सहभागी होण्यासाठी विदर्भातून अनेक नागरिक गेले होते. चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया आदी ठिकाणांहून हे नागरिक सहभागी झाले होते. संमेलन संपल्यानंतर हे सर्व नागरिक आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी परतले आहेत. कोरोना संसर्गजन्याच्या पार्श्वभूमीवर या परतलेल्या नागरिकांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरू आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील दोघेजण दिल्लीहून परत आले होते. यातील एक नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे असून दुसऱ्याचा अद्याप तपास लागलेला नाही. या व्यक्तीचा शोध घेतला जात असल्याचे चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले. राजुरा येथील एका व्यक्तीला पोलिसांनी विलगीकरण कक्षात ठेवले आहे. हाही व्यक्ती दिल्लीहून आला होता असे कळते.
त्या १९ जणांचा जिल्हा यंत्रणेकडून शोध सुरू
गोंदिया जिल्ह्यातील तबालिक जमातीचे जिल्ह्यातील १९ जण दिल्लीला गेले होते अशी प्राथमिक माहिती आहे. मात्र ते निजामुद्दीनहून अद्याप जिल्ह्यात परतले नसल्याची माहिती आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासानाकडून या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळपासून या १९ जणांची शोध मोहीम जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. याला जिल्हा प्रशासनाने सुध्दा दुजोरा दिला आहे. या व्यक्तींचा शोध लागल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करुन कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने त्यांची तपासणी केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वर्ध्यातील आठ व्यक्ती निजामुद्दीनमध्ये कोरोना बाधिताच्या संपर्कात?
दिल्लीच्या निजामुद्दीन येथे झालेल्या एका धार्मिक संमेलनात काही व्यक्ती कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्याचे उघड झाले आहे. या संमेलनात वर्धा जिल्ह्यातील आठ जण सहभागी झाले होते. त्यामुळे तेही कोरोना बाधिताच्या संपर्कात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या आठपैकी एक व्यक्ती आर्वीत पोहोचला असून सात व्यक्ती अद्यापही जिल्ह्यात दाखल झाले नसल्याचे सांगितले जात आहे.
जिल्ह्यातील आठ व्यक्ती निजामुद्दीन येथे कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळताच प्रशासनाकडून आठही जणांचा शोध सुरु केला आहे. त्यातील एकच व्यक्ती आर्वी येथे पोहोचला असून प्रशासनाने त्या व्यक्तीची आणि त्याच्या परिवारातील सदस्यांची आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यांना कोणतीही बाधा नसून खबरदारी म्हणून त्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. इतर सात व्यक्ती अद्यापही जिल्ह्यात पोहोचले नसून ते दिल्ली, आग्रा, नागपूर तसेच भंडारा जिल्ह्यात असल्याची माहिती आहे. त्यामुळे तेथील जिल्हाधिकाºयांना त्या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिली. वर्धा जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण आढळला नाही पण, निजामुद्दीन येथून आलेल्यामुळे प्रशासनाच्याही अडचणी वाढविल्या आहे
यवतमाळ जिल्ह्यातील 12 जण सहभागी
कोरोना संशयितांबाबत प्रशासनाकडून खास खबरदारी घेतली जात असतानाच जिल्ह्यातील १२ जण दिल्ली येथे पार पडलेल्या निजामुद्दीन संमेलनात सहभागी झाले होते, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे कोरोना संशयित म्हणून हे १२ जण आरोग्य प्रशासनाच्या रडारवर आले आहे. यामुळे या संमेलनात नेमके किती आणि कुठले लोक सहभागी झाले याचा शोध सर्व राज्यांनी घेतला. त्यातूनच यवतमाळ जिल्ह्यातील १२ लोक संमेलनाला गेले होते, अशी माहिती व त्यांच्या नावांची यादी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली. प्रशासनाने लगेच या १२ व्यक्तींची शोधाशोध चालविली. त्यातील पाच जण परत आल्याचे आढळून आले. त्यांना आता वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले गेले आहे. अद्याप त्यांचे अहवाल प्राप्त झालेले नाही. अहवालानंतरच हे पाच जण पॉझिटीव्ह की निगेटीव्ह हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतरच उपचाराची पुढील दिशा निश्चित होईल.